Wed, Oct 24, 2018 02:10



होमपेज › Ankur › कथा,राजाचा जावई

कथा,राजाचा जावई

Published On: Dec 02 2017 12:29AM | Last Updated: Dec 01 2017 8:38PM

बुकमार्क करा





एका घनदाट अरण्यात बहुतांश पक्षीच राहत होते. इंद्रजित नावाचा हंस त्या सर्व पक्ष्यांचा राजा होता. एकदा राजा इंद्रजितने सर्व पक्षी प्रजेला कळविले की त्याची कन्या राजकुमारी पलक हिचे स्वयंवर  रचण्यात आले असून सर्व इच्छुक वरांनी या स्वयंवराला हजर रहावे. स्वयंवरात राजकुमारी पलकने सुंदर नावाच्या मोराला पती म्हणून वरले. शाही विवाहाचा मुहूर्त एका महिन्यानंतरचा ठरला. राजाचा जावई होणार असल्याने मोराला अतिशय गर्व चढला. तो इतरांना तुच्छ लेखू लागला.

“मी या अरण्यातील सर्वात देखणा पक्षी आहे. माझ्यासारखे नृत्य कोणी करू शकेल का?’’ तो सर्वांना विचारत फिरू लागला. थोड्याच अवधीत पलकला सुंदरशी विवाह करण्याच्या निर्णयाचा पश्‍चात्ताप होऊ लागला. ती आपल्या वडिलांना म्हणाली,

“बाबा, मी सुंदरच्या देखणेपणावर व राजेशाही डौलावर भाळून त्याला पती म्हणून निवडले. मात्र आता मला कळून चुकले आहे की, तो अतिशय घमेंडी व मूर्ख आहे. त्याच्याशी माझा ठरलेला विवाह रद्द करा.’’ दुसर्‍या दिवशी सकाळी राजा इंद्रजितने सर्व पक्ष्यांसमोर घोषणा केली.

“प्रजाजनहो, मी माझी कन्या राजकुमारी पलक हिचा शाही विवाह रद्द करत आहे. राजकुमारी लवकरच दुसरा पती निवडेल.’’
सर्व पक्ष्यांना या घोषणेमुळे आश्‍चर्याचा धक्का बसला. सर्वात मोठा धक्का बसला तो सुंदर मोराला. पण राजकुमारीने हा निर्णय का घेतला हे कळायला त्याला वेळ लागला नाही.
“माझ्या घमेंडी स्वभावामुळे माझे नुकसान झाले. जर मी नम्रपणे वागलो असतो तर राजकुमारीला मी गमावले नसते.’’ तो स्वत:शीच म्हणाला.
तात्पर्य : अभिमान व गर्व यात छोटासाच फरक असतो. अभिमानाने आत्मविश्‍वास वाढतो व गर्वाने नुकसान होते.