होमपेज › Ankur › कथा : धूर्त कोल्हा 

कथा : धूर्त कोल्हा 

Published On: Oct 06 2018 1:45AM | Last Updated: Oct 06 2018 1:45AMएका शेतकर्‍याच्या शेतावर एक कुत्रा व एक कोंबडा राहत होते. एके दिवशी कुत्रा कोंबड्याला म्हणाला, “एकाच ठिकाणी राहून फार कंटाळा आला आहे. आपण सहलीला जाऊन येऊ या का?’’

कोंबड्याने होकारार्थी मान हलवली. दुसर्‍या दिवशी मालकाचा डोळा चुकवून ते दोघे सहलीला निघाले. त्यांनी सोबत काही मांसल हाडे व कुरकुरीत बिया खाण्यासाठी नेल्या. जंगलात दिवसभर सहलीचा आनंद लुटल्यावर रात्र पडल्यानंतर त्यांनी एका डेरेदार वृक्षाचा आसरा घेतला. वृक्षाच्या ढोलीत कुत्रा झोपला तर कोंबडा उंच फांदीवर आराम करू लागला. जेव्हा पहाट झाली तेव्हा कोंबड्याने सवयीप्रमाणे बांग दिली. कोंबड्याच्या बांगेने जवळ राहणार्‍या कोल्ह्याला जाग आली. मजेदार मेजवानीच्या आशेने त्याच्या तोंडातून लाळ टपकू लागली. तो त्या वृक्षाजवळ आला व कोंबड्याला म्हणाला,

“नमस्कार महाशय, जंगलात तुमचे हार्दिक स्वागत आहे. येथे एकटा राहून मलाही कंटाळा आला होता. बरे झाले तुमची सोबत मिळाली.’’

चतुर कोंबड्याने कोल्ह्याच्या या खोट्या प्रशंसेमागील कावा ओळखला व तो म्हणाला, 

“तुम्हाला भेटून मलाही आनंद झाला, तुम्ही या वृक्षाच्या ढोलीकडे जा. तेथे माझा दारवान तुमचे स्वागत करायला तयार आहे.’’

कोल्ह्याला काही संशय आला नाही. तो ढोलीकडे गेला. तेथे स्वागत करायला उभा असलेला कुत्रा पाहून कोल्ह्याला घाम फुटला व तो तडक तेथून पसार झाला.

(इसाप कथा)