Mon, Jun 17, 2019 10:15होमपेज › Ankur › विमान खाणारा माणूस

विमान खाणारा माणूस

Published On: Oct 06 2018 1:45AM | Last Updated: Oct 05 2018 6:49PMप्रसिद्धी मिळावी म्हणून माणसं काय वाटेल ते खातात. काचा, लोखंडाचे खिळे, ट्यूबलाईटचे तुकडे खाणार्‍या माणसांबद्दल आपण ऐकलं असेल. मात्र फ्रान्सच्या ग्रेनोबल गावातील मायकल लोटिटो या इसमाने चक्क अख्खे विमान खाऊन दाखविले होते! मोंसूर मॅग्नेटाउट म्हणजे ‘सर्वभक्षक’ असे टोपणनाव मिळालेल्या मायकलचा जन्म 1950 साली झाला. वयाच्या नवव्या वर्षांपासून तो काचा व लोखंडाचे तुकडे खाऊ लागला. ‘पिका’ या एका विकारामुळे निर्माण झालेली काचा व धातूच्या वस्तू खायची आवड आणि त्या पचवण्याची त्याची पोटाची क्षमता यामुळे मायकलने आपल्या आयुष्यात अठरा सायकली, सात टीव्ही संच, दोन बेड, पंधरा सुपर मार्केट ट्रॉलीज, एक संगणक, एक शवपेटी, दोन स्कीर्बंग बोर्डस् व सात काचेची झुंबरे पोटात रिचवली.

कहर म्हणजे 1978 मध्ये त्याने सेसना 150 हे एक छोटे विमानही खाऊन दाखवले. काचा व धातूच्या वस्तू खाण्याची मायकलची एक खास पद्धत म्हणजे त्यांचे अतिशय छोटे तुकडे करून नंतरच ते तुकडे तो खायचा. गंमत म्हणजे साधे केळे खाणे त्याला कठीण जायचे. गिनिज बुकात नोंद झालेला हा अद्भुत माणूस 2007 साली वयाच्या 57 व्या वर्षी मरण पावला.