होमपेज › Ankur › सरकता जिना

सरकता जिना

Published On: Jun 09 2018 1:39AM | Last Updated: Jun 08 2018 8:12PMएस्कलेटर म्हणजेच सरकता जिना आधुनिक काळातील एक महत्त्वाचा शोध आहे. शॉपिंग मॉल, मल्टीप्लेक्स, रेल्वे स्थानके, विमानतळ, उपहारगृहे इत्यादी ठिकाणी तुम्हाला सरकते जिने दिसतील. लोकांना एका मजल्यावरून दुसर्‍या मजल्यावर झटपट वेगाने जाण्यासाठी एस्कलेटर्स उपयुक्‍त ठरतात. मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे वहन करण्याची क्षमता असलेल्या तसेच उद्वाहनापेक्षा कमी खर्चिक व सुरक्षित अशा या सरकत्या जिन्याच्या निर्माणाचे श्रेय जेस्से रेनो या अमेरिकन संशोधकाला दिले जाते.

15 मार्च 1892 रोजी त्याने या शोधाचे पेटंट घेतले. त्याचा सरकता जिना चक्‍क वाफेवर चालणारा होता. त्याचा हा जिना न्यूयॉर्क शहरातील कोनी बेटावर बसवण्यात आला. व्यावसायिक वापरासाठीचा पहिला सरकता जिना चार्लस सीबर्गर या संशोधकाने ओटिस कंपनीच्या सहकार्याने बनविला. 1900 सालच्या पॅरिस येथील शोधांच्या प्रदर्शनात या शोधाला पहिला क्रमांक मिळाला. खालून वर जाणारे, वरून खाली येणारे, चक्राकार एस्कलेटर्स आधुनिक जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले आहेत.