Sat, Sep 21, 2019 05:56होमपेज › Ankur › कथा : सिंहाचे भय

कथा : सिंहाचे भय

Published On: Jun 08 2019 1:54AM | Last Updated: Jun 08 2019 1:54AM
एकदा जंगलचा राजा सिंह त्याच्या मित्राकडे, हत्तीकडे गेला. सिंहाची समस्या अशी होती की त्याला कशाचेच भय वाटत नसे. अपवाद एकच होता, तो म्हणजे कोंबड्याच्या आरवण्याचा! सिंहाने कोंबड्याची बांग ऐकली की तो थरथर कापू लागे. हत्तीने जेव्हा सिंहाची ही समस्या ऐकली तेव्हा त्याला हसू आवरेना. तो सिंहाला म्हणाला.
“तू जंगलाचा एवढा मोठा राजा आहेस. तुला कोंबड्याची बांग ऐकून भय कशाला वाटायला हवे? कोंबड्याच्या आवाजाने तुला काय त्रास होणार आहे?”
सिंहाला यावर काय बोलावे हे सुचेना. एवढ्यात एक डास हत्तीच्या कानाभोवती गुणगुणू लागला. त्या डासाला पाहताच हत्तीची बोबडी वळाली. तो सिंहाला म्हणाला, “ हा डास माझ्या कानात शिरला तर मी मेलोच.”
हत्तीने फार प्रयत्नाने त्याच्या सोंडेने डासाला चिरडून टाकले. आता हत्तीचे भय पाहून चकित होण्याची पाळी सिंहाची होती.

(झेन कथा)