Thu, Apr 25, 2019 12:22होमपेज › Ankur › खोटी प्रशंसा

खोटी प्रशंसा

Published On: Aug 11 2018 1:24AM | Last Updated: Aug 11 2018 1:24AMरायचंद हाथगढ संस्थानाच्या दरबारातील एक मंत्री होता. रायचंद एक देखणा गृहस्थ असल्याने त्याला आपल्या व्यक्‍तिमत्त्वाचा अभिमान होता. एकदा रायचंदला कळले, की उत्तमकुमार हा व्यापारी त्याच्याहीपेक्षा सौंदर्यवान आहे. मात्र उत्तमकुमारला त्याने कधी पाहिले नव्हते. रायचंदने आपल्या बायकोला विचारले.

“काय गं, सर्वात सुंदर कोण आहे? मी की उत्तमकुमार?”
“नि:संशय तुम्हीच जीवलगा!” त्याच्या बायकोने उत्तर दिले.
रायचंद या प्रशंसेमुळे खूश झाला. तो दरबारात गेला. त्याच्या एका सहकार्‍याला त्याने बायकोला विचारलेलाच प्रश्‍न विचारला.
“मला वाटतं संपूर्ण राज्यात तुमच्यासारखा देखणा पुरुष अन्य कोणी नसेल.” सहकारी म्हणाला.

रायचंदचे व्यापारी मित्र त्याला भेटण्यासाठी आले होते. व्यापारासाठी संस्थानिकांची मर्जी संपादन करण्याचा त्यांचा हेतू होता. जेव्हा रायचंदने त्याची व उत्तमकुमारची तुलना करण्यास त्यांना सांगितले तेव्हा ते म्हणाले की, “उत्तमकुमार तुमच्यासमोर काहीच नाही.”

रायचंद फारच खूश झाला. काही दिवसानंतर जेव्हा उत्तमकुमार दरबारात काही कामानिमित्त आला तेव्हा त्याला पाहून रायचंद विस्मयचकित झाला. उत्तमकुमार त्याच्यापेक्षा अनेक पटीने देखणा होता. त्याने विचार केला, ‘मी किती मूर्ख आहे. माझी पत्नी म्हणाली की मी देखणा आहे कारण ती माझ्यावर प्रेम करते. माझ्या सहकार्‍याने व मित्रांनीही तोच सूर लावला याचे कारण त्यांना माझ्याकडून सहकार्याची अपेक्षा होती. त्यामुळेच ते सर्वजण खोटे बोलले.’
रायचंदला कळून चुकले की प्रशंसा ही प्रेम, भीती किंवा फायद्यासाठी केली जाऊ शकते. तेव्हापासून त्याने खोट्या प्रशंसेपासून स्वत:ला नेहमी दूर ठेवले.