Tue, Jun 18, 2019 10:18होमपेज › Ahamadnagar › टिकटॉकमुळे शिर्डीमधील त्या तरूणाचा खून

टिकटॉकमुळे शिर्डीमधील त्या तरूणाचा खून

Published On: Jun 13 2019 1:30AM | Last Updated: Jun 13 2019 1:10AM
शिर्डी : प्रतिनिधी

सोशल मीडियावर सध्या गाजत असलेला टिकटॉकचा व्हिडिओ बनविण्याच्या नादात मित्रांकडून गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळीने प्रतिक वाडेकर याचे प्राण घेतले, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सनी धुळदेव (वय 20, रा. धुळदेव, फलटण) यास ताब्यात घेतले आहे. तसेच त्याचा मित्र नितीन अशोक वाडेकर (रा. लक्ष्मीनगर) यालाही ताब्यात घेतले आहे. सनी पवार याच्याकडे गावठी कट्टा व एक राऊंड मिळाला आहे. इतर आरोपींचा तपास पोलिस करीत आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिर्डी शहरात गजबजलेल्या नालारोडलगत असलेल्या  हॉटेल पवनधाम या ठिकाणी  सायंकाळी  फ्रेश होण्यासाठी चौघाजणांनी खोली घेतली होती.  यावेळी टिकटॉकचा व्हीडीओ बनविण्याच्या नादात सनी पोपट पवार याच्याकडून गावठी कट्ट्यातून गोळी सुटली. या गोळीने थेट प्रतिक वाडेकर याचा वेध घेतला. छातीत गोळी लागल्याने प्रतीकचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी या ठिकाणाहून धूम ठोकली. पोलिसांनी नाकाबंदी करीत दोघांना ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता सनी पवार याने आपल्याकडून चुकून गोळी सुटल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.