Thu, Jun 04, 2020 01:18होमपेज › Ahamadnagar › यमाई मातेच्या भक्तीरसात भाविक चिंब 

यमाई मातेच्या भक्तीरसात भाविक चिंब 

Last Updated: Oct 10 2019 1:06AM
राशीन ः  वार्ताहर 

उदो बोला उदो, आईसाहेबांचा उदो । बोल भवानी की जय,  असा गगनभेदी जयघोष, सोबतीला ढोल-ताशे, नगारे आणि झांजांचा लयबद्ध आणि सातत्यपूर्ण गजर, रणसिंगाचा लक्षवेधी निनाद, तोफांची आसमंत दणाणून टाकणारी सलामी, चंगाळे- बंगळ्यांचा मर्दानी खेळ, आराधी व दिवट्यावाल्यांचे जथे, भाविकांच्या उत्साहाला आलेले उधाण अशा चैतन्यमय वातावरणात जगदंबा यमाई देवीचा पालखी महोत्सव भाविकांच्या साक्षीने दिमाखात साजरा झाला. या सोहळ्याने लाखो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. 

घटस्थापनेला सुरू झालेल्या यमाई मातेच्या यात्रेची कोजागिरी पौर्णिमेला सांगता होते. विजयादशमीनिमित्त उत्साहात सीमोल्लंघन झाले. यानिमित्त देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मध्यरात्री बारा वाजता निघणारी  ही मिरवणूक सायंकाळी सात वाजता देवीच्या मंदिराजवळ विसर्जित केली जाते. लाखोंच्या संख्येने भाविक या मिरवणुकीत सहभागी होतात. दसर्‍याच्या दिवशी सायंकाळी गावातील सर्व नागरिक सीमोल्लंघनासाठी जातात. तिथे एकमेकांना सोने (आपट्याची पाने) देऊन शुभेच्छा दिल्या जातात. घरी गेल्यावर सुहासिनीकडून औक्षण केले जाते. नंतर रात्री दहा वाजता नागरिक देवीच्या मुख्य यात्रेसाठी मंदिरात येतात. यावेळी देशमुख घराण्याचे वंशज शंकरराव देशमुख यांना श्री यमाई देवीला कौल मागण्यासाठी देवीसमोर बसविले जाते.

कौल (प्रसाद) मागण्यासाठी झेंडूच्या फुलांचा वापर करण्यात आला.आराधना करीत असतानाच आईसाहेब ते अशी हाक देतात. याचवेळी  देवीच्या उजव्या बाजूचे फुल (प्रसाद) शंकरराव देशमुख यांच्या हातात पडल्यावर सर्व भाविकांनी गुलालाची उधळण करीत देवीचा जल्लोष केला. मंदिरात ठेवलेल्या पालखी जवळ त्यांना उचलून आणण्यात आले. पूजार्‍यांनी देवीची मूर्ती पालखीत ठेवली. त्यानंतर  भाविकांनी एकच जल्लोष करीत पालखीवर गुलाल आणि खोबर्‍याचे मुक्तहस्ते उधळण केली.

सिंहाच्या आवारात पालखी आल्यानंतर भक्तीच्या या अनोख्या सागरात भान हरपून भाविक भक्तिरसात चिंब झालेले असताना रात्री एक वाजता मंदिरातून पालखीने प्रस्थान ठेवले. सकाळी सहा वाजता पालखी गावाच्या मुख्य रस्त्यावर आणण्यात आली. त्यानंतर दिवसभर संपूर्ण गावात पालखी प्रदक्षिणा घालते. यावेळी गावातील महिलांनी पालखी मार्गावर मनमोहक रांगोळ्या काढल्या. 

राज्यातून आलेल्या लाखो भाविकांची ठिकठिकाणी पालखी दर्शनासाठी झुंबड उडाली होती. यात्रेमुळे सर्व रस्ते, गल्ली बोळा, बाजारपेठेत गर्दी होती. संसारोपयोगी साहित्य, स्टेशनरी, कटलरी, खेळणी, मिठाईच्या दुकानांनी बाजारपेठ फुलून गेली होती. रात्री पालखी मंदिरात गेल्यावर  24 तास चाललेल्या पालखी सोहळ्याची शांततेत सांगता झाली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. देवीच्या या महोत्सवात मुस्लिम बांधव, सर्व मानकरी, पुजारी, राशीन पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विश्वस्त सहभागी झाले होते.