Mon, Sep 16, 2019 12:20होमपेज › Ahamadnagar › हंडाभर पाण्यासाठी महिलांचे हाल

हंडाभर पाण्यासाठी महिलांचे हाल

Published On: May 11 2019 2:02AM | Last Updated: May 11 2019 12:28AM
शेवगाव : प्रतिनिधी  

उष्ण निखार्‍यात पाण्यासाठी तडफड करणार्‍या महिला हाताने ओढण्याच्या छोट्या गाडीतून पाणी आणताना  घामाघूम होत आहे. मात्र, अडचण सोडविणारे अधिकारी अथवा कर्मचार्‍यांना दुष्काळाचा विसर पडला आहे.

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून जाणवत असलेला दुष्काळ आता गंभीर झाला आहे. पाणी व चारा या दोन बाबी मुख्यत्वे सतावत असताना ही अडचण कमी होण्यापेक्षा वाढत चालली आहे. चार्‍यासाठी शासनाने छावण्या सुरू केल्या असल्या तरी ‘अडला नारायण’ अशी शेतकर्‍यांची गत झाली आहे. पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले असून, गावोगाव पाण्यासाठी महिलांसह सर्व कुटुंबच पायपीट करताना दिसतात. टँकरने पाणीपुरवठा होणार्‍या गावात सकाळपासून रस्त्यावर होणारी गर्दी ही एक सर्कस झाली आहे. तेथील नागरिकांना पाणी एवढाच ध्यास लागलेला दिसतो. झोपेतही टँक्कर आला, या भासाने दचकून उठण्याचा शारीरीक बदल त्यांच्यात झाला आहे.

प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरळीत चालावी, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू असताना त्यात जलाशयाचा यत्यय येत आहे. लाभार्थी गावागावांत पाण्याचे नियोजन केले जात नसल्याने पाण्याची बोेंबाबोब होत आहे. एप्रिल महिन्यात आलेल्या दुष्काळी अडचणी मे महिन्यात गंभीर झाल्या आहेत. त्यात उष्णतेच्या लाटेने शरीराचा कहर होत आहे.अशा उन्हातही पाणी शोधणार्‍या अनवाणी पायांना बसणारा चटका हा दोषींना तळतळाट ठरत आहे.

सायकल, मोटारसायकल, बैलगाडी, टेम्पो अशा साधनाने पाण्याची वाहतूक करताना डोहीवर हंडा हंडा पाणी शोधणार्‍या काहींनी आता छोटीशी लाकडी गाडी तयार केली आहे. लहान मुले व महिला सारथी झाल्या आहेत. पुरेल तेवढे पाण्याचे भांडे ठेऊन हाताने लोटीत लोटीत घर जवळ करण्याचा त्यांचा प्रयत्न होत आहे.ही सर्कस ओढताना घामाघूम झालेल्या महिलांच्या मुखातून कधी एकदा पाऊस पडतोय हे शब्द आल्यावाचून राहत नाही.

दुष्काळात सहजासहजी सुटणार्‍या अडचणी कोणासमोर मांडाव्यात, हा मोठा प्रश्‍न सध्या निर्माण झाला आहे. जनतेला असणार्‍या दुष्काळाची कदर नसणारे स्थानिक कर्मचारी व अधिकारी यांचाही दुष्काळ जाणवत आहे. हवेच्या उपकरणाचा सहारा आणि वातानुकूलित वाहनात असणार्‍या अशा कर्मचार्‍यांना दुष्काळ काय करणार ही खंत निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीचे निवारण करण्यासाठी स्थानिक कर्मचार्‍यांनी कर्तव्याच्या ठिकाणी चोवीस तास दक्ष राहावे, असे आदेश शासनाने पारीत करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.