होमपेज › Ahamadnagar › भय्यूजी महाराजांच्या मालमत्तेची जबाबदारी विनायक दुधाडेवर

भय्यूजी महाराजांच्या मालमत्तेची जबाबदारी दुधाडेवर

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 14 2018 3:52PMपारनेर : प्रतिनिधी     

राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येनंतर वारसदार म्हणून ज्या सेवकाचे नाव पुढे आले आहे, तो पारनेर तालुक्यातील लोणी हवेलीचा आहे. विनायक दुधाडे असे त्याचे नाव आहे. वडील काशिनाथ दुधाडे यांच्यानंतर विनायक हा गेल्या 20 वर्षांपासून भय्यूजी महाराजांच्या सेवेत आहे. 

सातत्याच्या दुष्काळामुळे पारनेर तालक्यातील अनेक तरूणांनी विविध राज्यात जाऊन आपल्या चरितार्थासाठी हातपाय हलविले. अनेक जण विशेषतः मुंबईत गेले. काशिनाथ दुधाडे हे नोकरीच्या निमित्ताने इंदूरला गेले होते. नंतर ते भय्यूजी महाराजांच्या संपर्कात आले आणि त्यांचे सेवक झाले. दोनतीन वर्षांनंतर त्यांचा मुलगा विनायक भय्यूजींचा साधक झाला. वडिलांपाठोपाठ तो भय्यूजींचा सेवक झााला. कालपर्यंत त्यांच्या समवेत हाच विनायक होता. 

महाराजांनी स्वतःवर गोळी झाडली, त्यावेळी विनायक त्यांच्या घरातच होता. महाराजांनी जेवन घेतले की नाही, याची विचारपूसही त्यांच्या आईने विनायक याच्याकडेच केली. जेवणाची वेळ टळून गेल्यानंतरही मुलीच्या खोलीत असलेल्या महाराजांनी जेवणाची मागणी केली नाही, म्हणून विनायक अस्वस्थ असतानाच महाराज असलेल्या खोलीतून गोळीबाराचा आवाज आला. हा आवाज ऐकून विनायक तिथेच निःस्तब्ध झाला. महाराजांची आई, पत्नी यांनी विचारणा केल्यानंतर स्वतः विनायक याने खोलीचे दार तोडले. त्यानंतर महाराज रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात आल्यानंतर, विनायक यानेच त्यांना बॉम्बे हॉस्पिलटलमध्ये उपचारासाठी नेले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.  

विनायक हा गेल्या 20 वर्षांपासून भय्यूजी  महाराजांसोबत वास्तव्यास होता. अगदी त्याच्या विवाहासही महाराज त्याच्या सोबतच होते. त्यापुढील काळात विनायक याने महाराज यांचीच सेवा केली. महाराजांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्येही ‘परिवाराची जबाबदारी घेण्यासाठी कोणीतरी पाहिजे, मी तणावात आहे, थकलो आहे, विनायक माझा विश्‍वासपात्र आहे, सर्व गुतवणूक व मालमत्तेची जबाबदारी तोच सांभाळेल. कोणीतरी परिवाराची जबाबदारी सांभाळावी लागेल, ती विनायकच पूर्ण करेल. माझा त्याच्यावर पूर्ण विश्‍वास आहे. मी खोलीत एकटाच आहे, कोणाच्या दबावाखाली  नाही, माझ्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही’, असेही भय्यूजी महाराजांनी लिहिलेले आहे.