Fri, Sep 20, 2019 21:27होमपेज › Ahamadnagar › वाळूच्या डंपरने तिघांना चिरडले

वाळूच्या डंपरने तिघांना चिरडले

Published On: Jan 14 2019 1:19AM | Last Updated: Jan 14 2019 1:19AM
पारनेर/टाकळी ढोकेश्‍वर : प्रतिनिधी    

वाळूतस्करी करणार्‍या विनाक्रमांकाच्या डंपरने दुचाकीस धडक देत तिघांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पारनेर तालुक्यातील खडकवाडी-पळशी रस्त्यावर सायंकाळी पाच वाजता ही दुर्घटना घडली. अपघातानंतर डंपर घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, वाळूउपशास छुपा पाठिंबा देणार्‍या महसूल अधिकार्‍यांनी घटनास्थळी आल्याशिवाय मृतदेह हलू न देण्याचा पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेत रास्ता रोकोे आंदोलन केल्याने उशिरापर्यंत मृतदेह रस्त्यावरच पडून होते.

पळशीच्या नागापूरवाडी येथील गोरख कोंडिबा मेंगाळ (वय 40)  हा आदिवासी तरुण कामटवाडी येथील खंडोबाच्या यात्रोत्सवासाठी दुचाकीवर (क्र. एमएच 16 वाय 1914 ) आई  बुधाबाई कोंडिबा मेंगाळ (वय  65) यांना घेऊन गेला होता. यात्रोत्सवास भेट देऊन परतताना खडकवाडी येथे  वनकुटे येथील डॉ. डंबे यांची बहीण सुमन डंबे (वय  60) यांची भेट  झाली. त्यांनाही पळशी येथे जायचे असल्याने गोरख याने दुचाकीवर बसविले. तिघे खडकवाडी सोडून पळशीच्या दिशेने निघाले असता, हुलावळे वस्तीनजीक पाठीमागून येणार्‍या वाळून भरलेल्या विनाक्रमांकाच्या डंपरने दुचाकीस जोरदार धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार एकेरी असलेल्या या रस्त्यावर डंपरचालक भरधाव वाहन चालवित होता. पुढे दुचाकी चाललेली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला वाहनावर नियंत्रण आणता आले नाही. त्याने दुचाकीस जोरदार धडक दिल्यानंतर तिच्यावरील तिघेही हवेत उडाले, तर दुचाकी रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली. त्या पाठोपाठ डंपरने तिघांनाही चिरडले व त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे तिघांचा बळी जाऊनही डंपरचालकाने वाहन न थांबविता तेथून पळवून नेले.

दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर खडकवाडी तसेच पळशी येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अवैध वाळू उपसा, तसेच वाहतुकीविरोधात घोषणाबाजी करून पोलिस, तसेच महसूलच्या भ्रष्ट प्रशासनाचा निषेध करण्यात आला. महसूलचे अधिकारी घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत मृतदेह हलवू न देण्याचा आंदोलकांनी पवित्रा घेतला. त्यामुळे अपघातानंतर सुमारे तीन तास तीनही मृतदेह रस्त्यावरच पडून होते. घटनेनंतर िं2जल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, निलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव अ‍ॅड. राहुल झावरे, पारनेरचे पोलिस निरीक्षक  बाजिराव पोवार हे घटनास्थळी दाखल झाले. उशिरापर्यंत मृतदेह हलविण्यासंदर्भात काहीही निर्णय झालेला नव्हता.

विनाक्रमांकाच्या वाहनांकडे दुर्लक्ष! 

वाळूतस्करी करण्यासाठी विनाक्रमांकाच्या वाहनांचा वापर होत असल्यासंदर्भात ‘पुढारी’ने वारंवार आवाज उठवूनही पोलिस अथवा आरटीओंकडून त्यांच्यावर काहीही कारवाई केली नाही. अशाच प्रकारच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. पोलिस, महसूल, तसेच आरटीओ प्रशासनाशी असलेल्या ‘अर्थ’पूर्ण संबंधांमुळेच वाळूतस्करांना पाठबळ मिळत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.