Tue, Jun 02, 2020 21:16होमपेज › Ahamadnagar › नगरमध्ये आढळला कोरोनाचा तिसरा रुग्ण

नगरमध्ये आढळला कोरोनाचा तिसरा रुग्ण

Last Updated: Mar 25 2020 12:11AM
नगर : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा रुग्णालयाने सोमवारी (दि. 23) पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठविलेल्या 13 स्त्राव नमुन्यापैकी जिल्ह्यातील आणखी एक व्यक्ती कोरोना संसर्ग बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हयातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. कोरोनाची लागण झालेला हा रुग्ण नगर शहरातील रहिवासी असून, जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

नागरिकांनी स्वताची काळजी घ्यावी आणि विनाकारण घराबाहेर पडू नये. संपर्क टाळावा आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता हे संकट जास्त वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क असून त्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून कायद्याचे पालन करावे, असे ते म्हणाले.
एकूण 218 व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यापैकी 13 व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी काल पाठविण्यात आले. त्यांचा अहवाल आल्यानंतर एक व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाची लागण झालेली ही व्यक्ती सर्दी व खोकल्याचा त्रास होत असल्याने एका खाजगी हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत होती.

आता या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांची माहिती काढली जात आहे. त्याच्यावर उपचार केलेल्या डॉक्टर्स आणि नर्स यांना तात्काळ स्त्राव नमुने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात बोलावण्यात आले आहे. या रुग्णाला तात्काळ विलगीकरण (आयसोलेशन) कक्षात हलविण्यात आले आहेत. आतापर्यंत 200 जणांचे स्त्राव नमुने आतापर्यंत निगेटीव आले आहेत. दरम्यान, एकूण 263 व्यक्तींची तपासणी जिल्हा रुग्णालयामार्फत करण्यात आली आहे.

कोरोनाबाधित रुग्ण निघाला डॉक्टर

सदर बाधित रुग्ण हा डॉक्टर असून खासगी प्रॅक्टीस करीत असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले. त्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हा रुग्ण परदेशातून आलेला नाही. त्यामुळे तो कोरोना बाधित कशामुळे झाला, याची माहिती घेण्याचे काम आरोग्य यंत्रणेने सुरु केले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची  तसेच त्याच्या कुटुंबियांची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आता वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. जिल्हा यंत्रणेबरोबरच आता महसूल, आरोग्य आणि पोलिस दलाच्या सहकार्याने ग्रामीण भागातही गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.