होमपेज › Ahamadnagar › ऊस दराचे आंदोलन रात्रीही सुरू

ऊस दराचे आंदोलन रात्रीही सुरू

Published On: Nov 15 2017 1:45AM | Last Updated: Nov 15 2017 1:45AM

बुकमार्क करा

शेवगाव : प्रतिनिधी

ऊस दरासाठी शेतकरी संघटनेचे अंदोलन भडकले असून आज (मंगळवारी) घोटण येथे दुपारी 1 वाजता सुरू झालेले रस्तारोको आंदोलन तोडगा न निघाल्याने सायंकाळी उशिरापर्यंत चालू होते. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ऊस वाहतूक अडविल्याने ऊसाअभावी गेल्या दोन दिवसापासून गंगामाई कारखान्याचे गाळप बंद झाले आहे. अनेक वाहने रस्त्यावर उभी आहेत. तर वाहनांअभावी फडामधे ऊस तुटून पडलेला आहे.

चालू गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना 3 हजार 100 रुपये प्रतिटन भाव द्यावा, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना व शेवगाव, नेवासा, पैठण शेतकरी कृती समितीचे गेल्या दहा दिवसांपासून अंदोलन चालू आहे. आंदोलनात ऊसतोड बंद केल्यानंतर घोटण, नाजिक बाभुळगाव आदी रस्त्यांवरील ऊस वाहपे अडविण्यात येत आहेत. रविवारी घोटण येथे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोकळे, पश्‍चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रकाश बालवडकर, युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांच्या उपस्थितीत शेतकरी जनजागृती परिषद होऊन हे अंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मंगळवारी घोटण येथे ऊस दरासाठी दुपारी 1 वाजता संघटनेचे रस्ता रोको आंदोलन सुरू झाले स्वाभिमानी संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रकाश बालवडकर, युवक प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, दत्तात्रय फुंदे, बाळासाहेब फंटागरे, मच्छिंद्र आर्ले, दामोधर घुगे, लक्ष्मन टाकळकर, संजय क्षीरसागर, जनार्धन भागवत, बबन खोसे, काकासाहेब भराट, संतोष गायकवाड आदींसह अनेक ऊस उत्पादक शेतकरी अंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनकर्ते कोणाच्याही आश्‍वासनास बळी न जाता दर जाहीर झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी औरंगाबाद येथे आयुक्तांनी या संघटनेच्या कार्यकर्त्याना चर्चेसाठी पाचारण केले. बैठकीत रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नसल्याने आंदोलन चालूच राहिले. निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यावर अंदोलनकर्ते ठाम राहिले. यात भाषणे झाल्यावर भजने सुरु झाली. घोटण येथील शेतकर्‍यांनी अंदोलकासाठी जेवणाची व्यवस्था केली होती. ही जेवणावळी रस्त्यावरच होणार होती. उशिरापर्यंत चालू असलेल्या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा चार ते पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यात स्कूलबसचाही समावेश होता. 

दरम्यान, घोटण येथे ऊस वाहने अडविल्याने गंगामाई कारखान्याने दोन दिवसांपासून गाळप बंद आहे. रस्त्यावर ऊसाने भरलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहनाअभावी फडात ऊस तुटून पडला आहे. त्यामुळे त्याचे वजनही घटत आहे.

या आंदोलनात शेवगाव पैठण रस्त्यावर घोटण, नजिक बाभुळगाव, पैठण तालुक्यात पाटेगाव परिसरात ऊस वाहने अडवून गंगामाई कारखान्यास जाणीवपूर्वक वेठिस धरले जात असल्याचा आरोप होत आहे. इतर कारखान्यांचा ऊस पुरवठा सुरळीत चालू असून फक्त याच कारखान्याकडे येणारी वाहने अडवली जात आहेत. गेल्या आठवड्यापासून वारंवार असा प्रकार घडत असल्याने शेतकर्‍यांच्या ऊसाचे तसेच कारखान्याचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानीमुळे परिसरातील शेतकर्‍यात असंतोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने वेळीच यात लक्ष घालण्याची मागणी गंगामाई कारखान्याने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.