होमपेज › Ahamadnagar › रस्तादुरुस्तीसाठी जवळकेत रास्तारोको

रस्तादुरुस्तीसाठी जवळकेत रास्तारोको

Published On: Nov 15 2017 1:45AM | Last Updated: Nov 14 2017 10:18PM

बुकमार्क करा

कोपरगाव : प्रतिनिधी

झगडेफाटा ते रांजणगाव देशमुख हा रस्ता दुरुस्त करावा, यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर जवळके चौफुलीवर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी दि. 17 पासून या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन  सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहायक अभियंता संजय कोकणे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अ‍ॅड. योगेश खालकर यांनी या रस्त्याचे काम तातडीने सुरू करा, अन्यथा रास्तारोको करण्याचे निवेदन संबंधित विभागास दिले होते. त्याप्रमाणे जवळके येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. हा रस्ता अतिशय खराब झाला असून पायी चालणेही मुश्किल बनले आहे. वाहने चालविणे तर फारच जिकिरीचे काम झाले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली.
सहायक अभियंता संजय कोकणे यांनी आंदोलकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, या रस्त्याने रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होते. अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याला आणखी खड्डे पडले आहे. हा रस्ता फेब्रुवारी 2019 पर्यंत दोष दायित्व कालावधीत असून संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्त करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे संबंधित ठेकेदाराला कळविण्यात आले असून दि. 17 पर्यंत काम सुरू करण्याची हमी त्यांनी दिली आहे. मात्र, काम सुरू न झाल्यास दि. 18 तारखेपासून उपविभागामार्फत काम हाती घेण्यात येईल व सदरील खर्च हा ठेकेदाराच्या अनामत रकमेतून वसूल केला जाईल, तसेच दि. 31 नोव्हेंबरपर्यंत हा रस्ता पूर्णपणे दुरुस्त करण्यात येईल.

यावेळी अ‍ॅड. योगेश खालकर, बंडोपंत थोरात, बहादराबादचे सरपंच विक्रम पाचोरे, साईनाथ रहाणे, धनंजय वर्पे, रमेश गव्हाणे, बाबूराव थोरात, रामभाऊ थोरात, वेसचे सरपंच माणिक दिघे, पंकज जोधंळे, कैलास गव्हाणे, जिजाबापू गव्हाणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.