Mon, Jun 17, 2019 10:45होमपेज › Ahamadnagar › पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळे फासले 

पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळे फासले 

Published On: Oct 12 2018 1:11AM | Last Updated: Oct 12 2018 1:11AMसंगमनेर :

देशात दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ करणार्‍या  सरकारचा निषेध व्यक्त करत, होर्डिंगवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी गुरुवारी (दि.11) काळे फासले. दरम्यान, परवानगी नसतानाही आंदोलन करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सत्यजित तांबेंसह अन्य 20 ते 25 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात गुरूवारी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.  

या आंदोलनादरम्यान, नाशिक रस्त्यावरील व कॉलेज जवळील ऐश्‍वर्या पेट्रोल पंपावर सत्यजित तांबे यांनी नरेंद्र मोदी यांच्या फ्लेक्सवरील फोटोला काळे फासून नुकसान केले.  याप्रकरणी पोलिस हवालदार बाळासाहेब यादव यांच्या फिर्यादीवरून संगमनेर पोलिसांनी सत्यजित तांबे, युवकचे तालुकाध्यक्ष अनंत वर्पे,  मोहन गुंजाळ, सोेमेश्‍वर दिवटे, विजय उदावंत, संभाजी गुंजाळ, सुनील रुपवते, अमित गुंजाळ, अनिस शेख, ज्ञानेश्‍वर नाईक, नगरसेवक पीरमंहमद शेख, नितीन अभंग, दानिश पठाण, निखील पापडेजा, रमेश नेहे, वैष्णव मुतर्डक, सात्विक पंडित यांच्यासह 20 ते 25 जणांवर गुन्हे केले आहेत.दिल्ली नाक्याजवळ कार्यकर्ते मोदींच्या फोटोला काळे फासण्यासाठी गेले होते. मात्र,  पोलिस तेथे पोहचल्याने कार्यकर्त्यांनी धूम ठोकली.