होमपेज › Ahamadnagar › साटंलोट्याच्या राजकारणातच धन्यता..!

साटंलोट्याच्या राजकारणातच धन्यता..!

Published On: Aug 27 2018 1:12AM | Last Updated: Aug 26 2018 11:01PMगोरख शिंदे

महापालिकेच्या स्थापनेनंतर आता चौथी सार्वत्रिक निवडणूक येऊ घातलीय. आतापर्यंत झालेल्या सर्वच निवडणुकांत कोणत्याच एका राजकीय पक्षाला कधीही एकहाती बहुमत मिळालं नाही. युती किंवा आघाडी करूनच राजकीय पक्ष सत्तेवर स्वार झाले. मात्र, दर अडीच वर्षांनी महापौर-उपमहापौर निवडणुकीतील खांदेपालट पाहता, महापालिकेत साटंलोट्याचंच राजकारण करण्यातच राजकीय पक्षांनी धन्यता मानल्याचं दिसून येतंय. वेगवेगळ्या पक्षात असले तरी नातंगोत्यांचं ‘सोधा’ राजकारणही एकमेकांना पूरकच ठरल्याचं दिसून येतंय. त्यातही पहिली महापौर-उपमहापौर निवडणूक वगळता दरवेळी ‘फोडाफोडी’ अन् ‘घोडेबाजार’ करूनच सत्तेच्या लाटेवर राजकीय पक्ष स्वार झाले अन् मग केलेल्या खर्चाची ‘वसुली’ करण्यातच पदाधिकार्‍यांचा पूर्ण कार्यकाळ गेल्यानं, शहराच्या विकासाची ‘स्वप्न’ अधुरीच राहिली. त्यामुळं महापालिकेच्या स्थापनेनंतर गेल्या पंधरा वर्षांतही सर्वसामान्य नगरकर मूलभूत सोईसुविधांसाठी पारखाच झालेला आहे. अर्थात राजकारण्यांइतकाच मतदारही त्यास जबाबदार आहे, हे नाकारून चालणार नाही. कारण, निवडून येण्यासाठी उमेदावारांच्या ‘दाम करी काम’ला बहुतांश मतदारांची ‘साथ’ लाभलेली आहे. त्यामुळं लाखो, कोटी रूपये पणाला लावून सत्तेवर स्वार होणार्‍यांकडून शहराच्या विकासांची अपेक्षा ठेवणार तरी कशी? अर्थात याला कोणताही राजकीय पक्ष अपवाद ठरलेला नाही. आताही येणार्‍या निवडणुकीत असाच लाखो-करोडोंचा चुराडा होईल. त्यातही नव्या प्रभागरचनेमुळे विस्तार वाढल्याने इच्छुकांना खर्चाचा विस्तारही वाढवावा लागणार आहे. त्यामुळं एकदा निवडून आलं की लगेच ‘संधी’चा लाभ उठविण्यासाठी सत्तेच्या गोटात जाण्याची ‘साधूं’ची तयारी सुरू होणार. यात नगरकारांना नवं तसं काही नाही, कारण राजकारण म्हटलं की गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे चालणारंच.

सन 2003 साली महापालिकेची स्थापना झाल्यानंतर अवघे तीन महिनेच प्रशासकीय ‘राज’ राहिले. त्यानंतर डिसेंबरमध्ये निवडणूक झाली. या पहिल्या निवडणुकीत 65 सदस्य निवडून आले होते. त्रिसदस्यीय रचनेत 21 प्रभागीतील दोन प्रभागातून प्रत्येकी चार सदस्य निवडले गेले होते. त्यावेळी शिवसेना-भाजपाची युतीने 33 (शिवसेना 18, भाजपा 15) जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळविले. काही अपक्षही त्यांना येऊन मिळाल्याने बहुमतात आणखी भर पडली. शिवसेनेचे भगवान फुलसौंदर महापौर तर भाजपाचे ज्ञानेश्‍वर खांडरे उपमहापौर झाले. पण, वर्ष दीड वर्षातच अंतर्गत कलहाने शिवसेनेत फूट पडली अन् 18 पैकी 11 जणांनी बाहेर पडत महानगर विकास आघाडी स्थापन केली. त्यामुळं शिवसेना बॅकफूटवर गेली. मग काय अडीच वर्षांनी काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीने महानगर विकास आघाडी, काही अपक्ष व भाजपाच्या काही फुटीरांच्या मदतीने सत्ता स्थापन केली. काँगे्रसचे संदीप कोतकर महापौर तर महानगर विकास आघाडीचे दीपक सूळ उपमहापौर झाले. फोडाफोडी अन् घोडेबाजाराच्या राजकारणाला येथून जी सुरुवात झाली ती आजही कायम आहे. 

त्यानंतर 2008 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत एका प्रभागात एक सदस्य अशी प्रभाग रचना होती. या निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. शिवसेना-भाजपाची युती झाली खरी. पण शिवसेनेने आपल्या 18 जागा कायम राखल्यातरी भाजपा मात्र 11 जागापर्यंत खाली आला. महानगर विकास आघाडीही संपुष्टात येऊन त्यातील केवळ दोन सदस्यांच्या रूपाने मनसेचा उदय झाला. राष्ट्रवादी काँगे्रसचे संख्याबळ वाढलेले असताना काँगे्रसचे मात्र घटले. सिंगल वॉर्डमुळे अपक्षांची संख्या वाढली. मग काय राष्ट्रवादी काँगे्रस-काँगे्रस आघाडीने मनसे, अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादीचे संग्राम जगताप महापौर तर अपक्ष हाजी नजीर शेख उपमहापौर झाले. मात्र, अडीच वर्षांनंतर महापालिकेच्या सत्तेत पुन्हा खांदेपालट झाला अन् शिवसेना-भाजपा युती सत्तेत आली. त्यांना मनसेच्या या दोन सदस्यांसह अपक्षांचीही साथ मिळाली. शिवसेनेच्या शीला शिंदे महापौर तर भाजपाच्या गीतांजली काळे उपमहापौर झाल्या. नात्यागोत्याच्या राजकारणात सत्ता राबविताना विशेषत: महापौर शिंदे यांना काँगे्रस-राष्ट्रवादीची अप्रत्यक्ष का होईना ‘सोयीस्कर’ साथ मिळाली. 

सन 2013 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत द्विसदस्यीय प्रभागरचना झाली. वाढलेल्या लोकसंख्येमुळे 34 प्रभागांत 68 सदस्य झाले. या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती झाली पण जागावाटपाच्या वादातून अनेक प्रभागांत अपक्षांना ‘पुरस्कृत’ करीत दोन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले. काँगे्रस व राष्ट्रवादीचीही आघाडी झालेली होती.  पण कोणालाच बहुमत मिळाले नाही. मात्र, ‘फोडाफोडी’ अन् ‘घोडेबाजारा’चा पायंडा कायम ठेवत, राष्ट्रवादी काँगे्रस व काँगे्रस आघाडी अपक्षांच्या मदतीने पुन्हा सत्तेवर स्वार झाली. महापौरपदी संग्राम जगताप पुन्हा विराजमान झाले, तर काँगे्रसच्या सुवर्णा कोतकर उपमहापौर झाल्या. नंतर संग्राम जगताप आमदारपदी निवडून आले आणि त्यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला. नंतर महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर निवडून आले.

त्यांच्या वर्षभराच्या कार्यकाळानंतर अडीच वर्षांनी झालेली निवडणूक शिवसेना व भाजपातील अंतर्गत वादानेच गाजली. युती असूनही भाजपातील खा.दिलीप गांधी गटाने वेगळी चूल मांडली अन् त्यांना राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीची ‘साथ’ मिळाली. भाजपाचा आगरकर गट शिवसेनेसोबतच राहिला. मात्र, शेवटच्या क्षणी वरिष्ठ पातळीवर तडजोड होऊन महापौरपदी शिवसेनेच्या सुरेखा कदम, तर उपमहापौरपदी भाजपाचे श्रीपाद छिंदम यांची वर्णी लागली. मात्र, नंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने वादग्रस्त ठरलेल्या छिंदमने उपमहापौरपदाचा राजीनामा दिला (राजीनामा कुणी घेतला, दिला की नाही दिला, हा वाद सध्या छिंदमच्या आक्षेपांमुळे गाजत आहे). नंतर उपमहापौरपदावर शिवसेनेचे अनिल बोरूडे बिनविरोध निवडून आले. त्यासाठी विरोधकांकडून उमेदवार न देता त्यांना ‘अप्रत्यक्ष’ साथ मिळाली. असं हे पंधरा वर्षांतील साटंलोट्याचं राजकारण महापालिकेत सुरू आहे. आता डिसेंबरमध्ये होणार्‍या निवडणुकीत कोण बाजी मारणारं, हे निकालानंतरच ठरेल. गुडघ्याला बाशिंग बांधून सत्तेच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेकांची आतापासूनच रस्सीखेच सुरू झालीय.पण, साटलोट्याचं राजकारण मात्र भविष्यातही सुरू राहणार, हे नक्की..!