Wed, Jun 19, 2019 09:20होमपेज › Ahamadnagar › जागृत देवस्थान श्री मळगंगा देवी (Video)

जागृत देवस्थान श्री मळगंगा देवी (Video)

Published On: Oct 12 2018 9:28AM | Last Updated: Oct 12 2018 12:44PMनिघोज (ता. पारनेर, जि. अहमदनगर) : संतोष ईधाटे 

पारनेर व शिरूर पासून २४ किमी. अंतरावर असलेल्या नगर जिल्ह्यातील श्री. माता मळगंगा देवी हे एक जागृत देवस्थान आहे. या मातेच्या दर्शनासाठी नवरात्रात मोठी गर्दी होत असते. देवीची मुख्य याञा चैत्र शुद्ध प्रतिपदा अष्टमीला असते. मात्र, वर्षभरातील शुक्रवार असो किंवा मंगळवार देवीच्या उत्‍सवादिवशी प्रचंड गर्दी असते. देवी नवसाला पावणारी म्हणून नावलौकिक असल्याने राज्यभरातील विविध भागातून नवरात्रौत्‍सवात भाविक मोठ्या संख्येने येत असतात. 

गावाची लोकसंख्या २५ हजारांच्या आसपास आहे. जवळूनच कुकडी नदी वाहत असते. पुणे जिल्ह्‍यातील कुकडी प्रकल्पातील पाणी निघोज व परिसरातील शेतीला आठमाही मिळत असल्याने गाव आर्थिकदृष्ट्‍या समृद्ध आहे. एकेकाळी संपूर्ण पारनेर तालुक्यातील बहुतांश गावात दुष्काळी परिस्‍थिती असायची. निघोज परिसरात मात्र पाण्‍याचा अभाव कधीच राहिला नसून हा देवीचा साक्षात्कार असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. गावावर अस्मानी संकट आले तरी मातेचे नाव घेतले तरी देवी मळगंगा या संकटातून सहिसलामत बाहेर काढते, अशी श्रध्‍दा आहे. 

देवी सहीत सात बहिणी निघोज, नगर तालुका दरेवाडी नेवासा, जुन्नर तालुक्यात उंब्रज, आंबेगाव तालुक्यात धोलवड, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर, पारनेर तालुक्यातील करंदी व चिंचोली अशी ही सात स्थाने असून पालखीच्या माध्यमातून या सर्व बहिणी चैत्र शुद्ध प्रतिपदा अष्टमीला निघोज यात्रे निमित्ताने त्या एकत्र येत असतात. 

नवरात्राचे वैशिष्ट्य असे आहे की, देवीची मुख्ययात्रा चैत्र शुद्ध प्रतिपदा अष्टमीला असते. त्यावेळी देवी कुंडावर जाते आणि दसऱ्याच्या दिवशी देवी निघोजला येते. ६ महिने कुंडस्थळी व ६ महिने निघोज स्थळी देवी असल्याने या दोन्ही ठिकाणी वर्षभर देवदर्शनाचा भाविक मोठय़ा प्रमाणात लाभ घेतात.

निघोजचे मळगंगा तीर्थक्षेत्र व कुंडमाऊली मळगंगा तीर्थक्षेत्राला राज्य सरकारने तीर्थक्षेत्र दर्जा दिल्याने मोठ्‍या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. यामध्ये मुंबई व निघोज ग्रामस्थ, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज ग्रुप ग्रामपंचायत यांनी सर्वांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने निघोज व परिसरात गेली दहा वर्षात मोठ्‍या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. यामध्ये रस्ते, नगर व पुणे जिल्‍ह्‍यातील जनतेला जोडणारा पुल, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृह, भाविकांसाठी निवास व्यवस्था, हायमॅस्क दिवे, आरोग्य सुविधा अशाप्रकारे कामे झाली आहेत. तसेच मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टने निघोज व कुंडावर लोकसहभागातून दोन मोठी मंदिरे बांधली आहेत. निघोज येथे व्यवसायिकांसाठी शॉपिंग सेंटर व भाविकांना राहण्याची व्यवस्था अशाप्रकारे लोकसहभागातून ५ कोटींची कामे झाली आहेत. लवकरच मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अत्याधुनिक कार्यालय व सभागृह हे काम सुरू होणार असून यासाठी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे संस्थापक स्व. बाबासाहेब कवाद यांच्या परिवाराने तीन लाख एकवीस हजार रुपयांची देणगी दिली आहे. अशाप्रकारे मळगंगा देवी हे एक जागृत देवस्थान असून नवसाला पावणारी देवी म्हणून या स्थानाचा मोठा साक्षात्कार असल्याने नवरात्रौत्सवाच्या कार्यकाळात या ठिकाणी मोठी गर्दी असते.