Mon, Sep 16, 2019 05:30होमपेज › Ahamadnagar › कोण असणार सर्वाधिक श्रीमंत उमेदवार?

कोण असणार सर्वाधिक श्रीमंत उमेदवार?

Published On: Mar 27 2019 1:50AM | Last Updated: Mar 26 2019 11:56PM
नगर : प्रतिनिधी

लोकसभेच्या नगर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची धामधूम उद्यापासून (दि.28) सुरु होत आहे. उमेदवारी अर्जाबरोबर चल आणि अचल संपत्तीचे विवरणपत्र, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आदींचे प्रतिज्ञापत्र उमेदवारांना सादर करावे लागणार आहे. नगर मतदारसंघात सर्वाधिक श्रीमंत उमेदवार कोण  असणार याची उत्सुकता मात्र ताणली गेली आहे. या मतदारसंघातील निवडणूक चित्र 8 एप्रिल 2019 रोजी स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यात लोकसभेचे नगर आणि शिर्डी हे दोन मतदारसंघ आहेत. नगर मतदारसंघाची निवडणूक 23 एप्रिल तर शिर्डी मतदारसंघाची निवडणूक 29 एप्रिल रोजी होणार आहे. नगर मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना गुरुवारी (दि.28) जारी होणार आहे. याच दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. भाजपा-शिवसेना युतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाकडून डॉ. सुजय विखे पाटील, काँग्रेस  आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. संग्राम जगताप व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुधाकरराव आव्हाड यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल आहे. या दिवशी निवडणुकीत किती उमेदवार असणार याचा आकडा कळणार आहे. 

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरु होत आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल व्दिवेदी उमेदवारी अर्ज स्वीकारणार आहेत. उमेदवारी अर्जाच्या नमुना 2 ए बरोबर उमेदवारांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. यामध्ये चल आणि अचल संपत्ती किती आहे याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. यामध्ये सोन्याचे  आणि चांदीचे दागिणे, रोकड पैसे, स्थावर मालमत्ता आदींचा समावेश असणार आहे. उमेदवारांची संपत्ती किती आहे. याचे कुतूहल मात्र सर्वसामान्य जनतेला असते. त्यामुळे आपल्या मतदारसंघातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता मतदारांना लागली आहे. यासाठी मात्र मतदारांना 4 एप्रिलची वाट पाहावी लागणार आहे. 

याशिवाय उमेदवारी अर्जाबरोबर किती पोलिस ठाण्यांत किती गुन्हे दाखल झाले आहेत. शिक्षा झालेली आहे का याची तंतोतंत माहिती प्रतिज्ञापत्रासह उमेदवारांना सादर करावी लागणार आहे. उमेदवारी अर्जाबरोबर सादर करण्यात येणार्‍या प्रतिज्ञापत्र तयार करण्याचे काम इच्छुक उमेदवारांकडून वकिलांमार्फत सुरु आहे.  उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांना 25 हजार रुपये रोख भरावे लागणार आहेत. मागासवर्गीय उमेदवारांसाठी मात्र 12 हजार 500 रुपयांची रोकड भरावी लागणार आहे. मात्र त्यासाठी जातप्रमाणपत्र अर्जाबरोबर जोडावे लागणार आहे.

अपक्षाला दहा सूचकनोंदणीकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या अर्जावर सूचक म्हणून एक सूचक लागणार आहे. त्यासाठी मात्र सदर सूचक हा मतदार संघातील असावा. त्याचबरोबर त्यांचे मतदारयादीत नाव असणे बंधनकारक आहे. अपक्ष उमेदवारी करणार्‍यांना मात्र 10 सूचक लागणार आहेत. त्या सर्वांचे नाव मात्र मतदारयादीत असणे गरजेचे आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार अर्ज उपलब्ध केले जाणार आहे. एका उमेदवाराला चार उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. एका उमेदवाराला दोन मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातून किती उमेदवार दोन्ही मतदारसंघातून अर्ज भरणार याकडे देखील जनतेचे लक्ष लागले आहे.