Mon, Jun 17, 2019 10:11होमपेज › Ahamadnagar › मोदींनी गुजरातेत प्लास्टिकबंदी करावी!

मोदींनी गुजरातेत प्लास्टिकबंदी करावी!

Published On: Oct 12 2018 1:11AM | Last Updated: Oct 12 2018 1:11AMनगर : प्रतिनिधी

देशात प्लास्टिक बंदीचा कायदा करून त्याची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. राज्यातील उत्पादन 90 टक्के बंद झालेय. मात्र, गुजरात व दीव दमणमधून काही उत्पादक राज्यात प्लास्टिक विक्री करत आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. महाराष्ट्रामुळे पंतप्रधानांचा ‘युनो’त सन्मान होऊन प्लास्टिकबंदीच्या समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांनी आता गुजरातमध्येही प्लास्टिकबंदी करावी, अशी विनंती त्यांना करणार असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.

नगर येथील शिवसेनेच्या वक्ता शिबिरानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रामदास कदम म्हणाले की, राज्यात जनतेने प्लास्टिकबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. प्लास्टिकबंदीनंतर व्यावसायिकांना पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुरेशी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही. आतापर्यंत तीनशे टन प्लास्टिक जप्त केले असून, पावणेतीन कोटींचा दंड वसूल झाला आहे. येत्या काही दिवसांत हायकोअर कमिटीची बैठक होणार आहे. व्यापार्‍यांकडून प्लास्टिकबंदीच्या कायद्याची माहिती असल्याचे व आम्ही प्लास्टिक वापरणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र घेतले जाणार आहे. त्यानंतर अधिसूचना प्रसिद्ध होऊन कठोर कारवाईला सुरुवात होणार आहे. सध्या परवाने नूतनीकरण करतानाच असे प्रतिज्ञापत्र घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

गुजरातमधून छुप्या मार्गाने राज्यात प्लास्टिक विक्री होत असल्याचा प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्या काही गाड्या जप्तही करण्यात आल्या आहेत. दमण येथील काही उत्पादक अद्यापही राज्यात प्लास्टिक विकत आहेत. त्यांची माहिती गुजरात सरकारला देण्यात येणार आहे. तसेच या उत्पादकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे पर्यावरण मंत्री कदम यांनी सांगितले.