Mon, Sep 16, 2019 06:17होमपेज › Ahamadnagar › शिर्डीतून अपक्ष लढणार : वाकचौरे

शिर्डीतून अपक्ष लढणार : वाकचौरे

Published On: Mar 13 2019 1:41AM | Last Updated: Mar 13 2019 1:41AM
श्रीरामपूर : प्रतिनिधी

शिर्डी लोकसभा मतदार संघातून आपल्याला शिवसेने उमेदवारी द्यावी म्हणून मागणी केली आहे. त्यांनी उमेदवारी दिली तर ठिक नाहीतर अपक्ष म्हणून आपण लढणारच. मतदार, कार्यकर्ता हाच आपला पक्ष असून त्यांच्याच इच्छेनुसार आपण निवडणूक लढणार असल्याची घोषणा माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.

वाकचौरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत श्रीरामपुरातून लढत असताना भाजापात प्रवेश करुन श्रीरामपूर विधानसभेची उमेदवारी केली होती. परंतु त्यावेळी त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. तेव्हापासून आतापर्यंत ते भाजपाच्या झेंड्याखाली काम करीत आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील गावे पिंजून काढली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याला संधी मिळेल, या आशेवर लोकांशी संपर्क ठेवला होता. मागील आठवड्यात काही कार्यकर्त्यांनी त्यांना निवडणूक लढण्याचा आग्रह केला होती. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवू. परंतु जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे मते जाणून घेण्यासाठी साई पालखी निवारा या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी सुभाष कुलकर्णी, रशिद बागवान, सदाशिव पटारे, शिवाजी दौंड, दत्तात्रय डोंगरे, सतिश बोरुडे, सुर्यकांत दातीर, शौकत जहागिरदार आदी उपस्थित होते. याप्रसंगी कोपरगाव, अकोले, संगमनेर, शिर्डी, राहाता, श्रीरामपूर, नेवासा येथील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवावी, शिवसेनेने दिली तर ठिक अन्यथा अपक्ष लढा, असा सूर कार्यकर्त्यांचा आला.

शिवसेनेच्या निर्णयाची प्रतिक्षा

मी शिवसेनेकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मागितली आहे. परंतु आतापर्यंत आश्‍वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून दोन दिवस मुंबईतच शिवसेनेच्या काही नेत्यांशी संपर्क साधून आहे. शिवसेनेने उमेदवारी दिली तर ठिक अन्यथा अपक्ष लढू,असा निर्णय वाकचौरे यांनी बोलून दाखविला.