Thu, Jun 04, 2020 00:20होमपेज › Ahamadnagar › ‘सिव्हिल’च्या आवारात जाळला कचरा

‘सिव्हिल’च्या आवारात जाळला कचरा

Last Updated: Oct 10 2019 1:09AM
नगर : प्रतिनिधी

शहर व उपनगर परिसरात कचरा संकलन पूर्ण क्षमतेने होत नसल्याने कचरा पेटविण्याच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. त्यातच आता जिल्हा रुग्णालय सारख्या शासकीय आस्थापनांकडूनही कचरा जाळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. सर्व सामान्य नागरिकांना दंड ठोठावर्‍या मनपा प्रशासनाने मात्र या प्रकाराकडे सोयीस्कर डोळेझाक केल्याचे चित्र आहे.

बुधवारी (दि.9) दुपारी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या परिचारिका प्रशिक्षण केंद्राजवळ असलेल्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात कचरा जाळण्यात आला. त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. सुमारे दोन-तीन तास कचरा जाळण्याचे काम सुरू होते. न्यायालयाने कचरा जाळण्यास प्रतिबंध केलेला आहे. सरकारनेही कचरा जाळणार्‍यांवर कारवाईची तरतूद केलेली आहे. मात्र, सरकारी आस्थापनांकडूनच कचरा जाळण्याचे प्रकार सुरू झाल्याने व महापालिका प्रशासन याकडे सोयीस्कर डोळेझाक करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, रुग्णालयातील संबंधित इमारतीच्या आवारात असलेल्या वृक्षांची तोड करून तोडलेली झाडेही जाळण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.