Fri, Sep 20, 2019 21:49होमपेज › Ahamadnagar › अबब.. गुटख्याची पुडी 100 रुपयांना!

अबब.. गुटख्याची पुडी 100 रुपयांना!

Published On: Mar 12 2019 1:48AM | Last Updated: Mar 12 2019 1:48AM
निघोज : वार्ताहर

पुलवामा हल्ल्यानंतर सिमेपलीकडून येणार्‍या जहाजांची कसून तपासणी  होऊ लागल्याने गुटख्याच्या तस्करीवर मोठे नियंत्रण आले आहे. राज्यात गुटखा बंदी असली, तरी तस्करीच्या मार्गाने गुटखा विक्री होत होती. परंतु, आता खर्‍या अर्थाने गुटखा बंदी लागू झाल्याने माल मिळेनासा झाला आहे. ‘उंची’ गुटख्याची एक पुडी तब्बल 80 ते 100 रुपयांना विकली जात आहे.

राज्यात गुटखा बंदी लागू झाल्यानंतर इतर राज्यांमधून गुटख्याची तस्करी करण्यात येऊन राज्यात त्याची सर्रास विक्री होत असे. मात्र कालांतराने राज्याच्या सिमेवर गुटखा पकडला जाऊ लागला होता. त्यामुळे विशेषतः ‘उंची’ अशी ओळख असलेला महागडा गुटखा इतर राज्यांतून परदेशात निर्यात झाल्यानंतर पुन्हा सागरी मार्गाने मुंबईत येत होता. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत येणारा गुटखा श्रीलंकेतून येणार्‍या मालवाहू जहाजांमधून येत असे. तेथून राज्याच्या विविध भागात त्याचे वितरण होत असे. पुलवामा हल्ल्यानंतर परदेशातून येणार्‍या जहाजांची कसून तपासणी होऊ लागल्याने चोरट्या मार्गाने येणार्‍या गुटख्याच्या तस्करीसही आळा बसला आहे.

राज्यात तंबाखू मिश्रीत पदार्थांवर बंदी असल्याने सुगंधीत सुपारी व तंबाखूच्या स्वतंत्र पुड्यांद्वारे गुटख्याची चोरटी विक्री सर्रास सुरू आहे. आता अशा पुड्या मिळणे देखील मुश्किल झाल्याने एका पुडीची 80 ते 100 रूपयांना विक्री केली जात आहे.