Wed, Jun 03, 2020 04:54होमपेज › Ahamadnagar › श्रीरामपुरात शस्त्र दाखवून २७ तोळे सोने लुटले

श्रीरामपुरात शस्त्र दाखवून २७ तोळे सोने लुटले

Published On: May 16 2019 2:03AM | Last Updated: May 16 2019 2:03AM
श्रीरामपूर : प्रतिनिधी
व्यापारी चंदन बालानी यांच्या घरातील लोकांना शस्त्राचा धाक दाखवून 27 तोळे सोने व 50 हजारांपेक्षा अधिक रोकड असा सुमारे 9 ते 10 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना शहरातील उत्सव मंगल कार्यालयाजवळ मंगळवारी (ता. 14) रोजी घडली. रात्रीच्यावेळी घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर येथील तेलाचे व्यापारी चंदन बालानी हे आपल्या उत्सव मंगलकार्यालयाजवळील अशोका रेसिडेन्सीच्या समोरील बंगल्यात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ यांच्यासमवेत राहतात. मंगळवारी रात्री हे कुटुंब नेहमीप्रमाणे जेवण करून झोपले. मध्यरात्रीनंतर बालानी यांच्या घराच्या मागच्या बाजूला असणार्‍या किचनच्या खिडकीचे गज कापून यातून एक दरोडेखोर आत शिरला. त्याने आत जाऊन आतल्या बाजूने लावलेली बाहेरच्या मुख्य दरवाजाची कडी आतून उघडली. त्यानंतर इतर दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. सर्वात प्रथम त्यांनी वरच्या मजल्यावरील बेडरूमचे दरवाजे बंद केले. त्यानंतर  घरातील हॉलमध्ये असलेल कपाटाची उचकपाचक केली. यानंतर त्यांनी आपला मोर्चा चंदन बालानी यांच्या बेडरूमकडे वळविला. बेडरूममध्ये चंदन बालानी यांची पत्नी विशाखा आणि 13 वर्षांची मुलगी रिया हे झोपलेले होते. बेडरूममध्ये प्रवेश करताच एका दरोडेखोराने बालानी यांच्या गळ्याला तलवारीसारखे धारदार शस्त्र लावले. त्यानंतर त्यांची मुलगी रिया उठली. तिलाही शस्त्राचा धाक दाखवून गप्प राहण्याचा दम दिला. अचानक झालेल्या या घटनेने बालानी कुटुंबिय पूर्णत: घाबरून गेले. त्यांनी मारहाण न करण्याची विनंती करून आपल्या अंगावरी दागिणे चोरट्यांना दिले. तसेच कपाटाच्या चाव्याही काढून दिल्या. चोरट्यांनी जाताना मोबाईल, लॅपटॉपही लांबविला. 

दरोडेखोर पसार होताच चंदन बालानी यांनी तातडीने कुटुंबातील वर झोपलेल्या सदस्यांना उठरविले. आसपास फोन लावले. पोलिसांनाही कळविले. 3.30 च्या सुमारास पोलिस निरीक्षक श्रीहरि बहिरट आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी आले. त्यांनी तातडीने तपासाला सुरूवात केली. त्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार, डीवायएसपी राहुल मदने आदींनी घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, पहाटे दरोडा पडल्यानंतर सकाळी 9 वा. नगरहून श्‍वान पथक या ठिकाणी बोलावण्यात आले. बंगल्याच्या मागच्या बाजूला काटवनात काही भांडे, बॅगा, फेकलेल्या आढळल्या. तेथून पुढे श्‍वानाने शिरसगाव हद्दीपर्यंत माग काढला.

चोरटे परप्रांतिय असण्याची शक्यता

चोरटे ऐकमेकांशी हिंदीत संवाद साधत होते. त्यामुळे ते परप्रांतिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. शिवाय बालाणी यांच्या घरातील संपूर्ण माहिती चोरट्यांनी असल्याचे चोरीच्या घटनेवरून कळते. बालाणी यांनी काही महिन्यांपूर्वीच बंगल्याचे काम केलेले आहे. तेव्हा काही परप्रांतियही कामावर असल्याचे कळते. त्यांचा या चोरीशी काही संबंध आहे का, याचा तपासह पोलिस करीत आहेत.