Wed, Feb 26, 2020 18:17



होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : जामखेडमध्ये ५ वर्षीय मुलीवर अत्याचार 

अहमदनगर : जामखेडमध्ये मुलीवर अत्याचार 

Last Updated: Jan 25 2020 2:14AM




जामखेड तालुका (अहमदनगर) : प्रतिनिधी 

शहरातील कान्होपात्रा नगर याठिकाणी एका पाच वर्षीय मुलीवर शेजारी रहाणार्‍या विवाहित नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने रात्री उशिरा जामखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सचिन शालन पवार (वय ३२) याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी, मंगळवार दि २१ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुलगी ही शेजारी राहणार्‍या सचिन शालन पवार (रा. कान्होपात्रा नगर, जामखेड) याच्या घरी गेली असता त्या ठिकाणी त्याने तिच्या अंगावरील कपडे काढून तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तू कोणाला सांगितलेस तर मारण्याची धमकी दिली. सदरची घटना घडूनही भीतीपोटी मुलीने ही घटना कोणाला सांगितली नाही. मात्र चिमुरडीस त्रास होऊ लागल्याने तिने गुरुवार २३ रोजी ही घटना आपल्या आईस सांगितली. त्यामुळे तत्काळ तिच्या आईने जामखेड पोलिस स्टेशनला धाव घेऊन फिर्याद दाखल केली. यावरुन त्याच्याविरोधात गुरुवार २३ रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.अत्याचार व बालकांचे लैंगिक आत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गुन्हा दाखल होत असताना त्या व्यक्तीच्या संबंधित नातेवाईकांकडून चिमुरडीच्या आईवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या दबावाला बळी न पडता पीडित मुलीच्या आईने फीर्याद दाखल केली. सदरचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी सचिन शालन पवार यास राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अवतारसिंग चव्हाण करत आहेत. लवकरच आरोपीस श्रीगोंदा येथील न्यायालय हजर करण्यात येणार आहे.