होमपेज › Ahamadnagar › कोपरगावात पोलिस यंत्रणेबाबत प्रश्‍नचिन्ह!

कोपरगावात पोलिस यंत्रणेबाबत प्रश्‍नचिन्ह!

Published On: Nov 15 2017 1:45AM | Last Updated: Nov 14 2017 10:25PM

बुकमार्क करा

कोपरगाव : प्रतिनिधी

तालुका व शहर परिसरात दुचाकी वाहने, छोटी मोठी दुकाने, टपर्‍या,  घरफोड्या होत असल्याने चोरट्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांत दिलेल्या फिर्यादींच्या एकाही चोरीचा तपास लागत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. थातूर-मातूर कारवाया केल्याचे पोलिस दाखवतात. मात्र, तालुक्यात सर्वत्र पोलिसांच्या कृपा आशिर्वादाने सर्व काही आलबेल सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सध्याचे पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांची नुकतीच नगर येथे बदली झाल्याने येथे नव्याने रुजू होणारे  पोलिस निरीक्षक अविनाश मोरे यांच्यापुढे  देखील  कायदा व सुव्यवस्था राखणे, तसेच विविध अवैध धंद्यांचा  बिमोड करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार असून ते त्यांच्यापुढे मोठे आव्हान राहणार आहे. 

कोपरगाव तालुका व शहर अशी दोन पोलिस ठाणी आहेत. मात्र, दोन्हींकडे असलेले संख्याबळ पाहता ते लोकसंख्येच्या तुलनेने तोकडे आहे. आ. स्नेहलता कोल्हे, साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपीनराव कोल्हे यांनी वारंवार गृह खात्याकडे पोलिस संख्याबळ वाढवावे, म्हणून मागणी केली आहे. मात्र, अद्यापि त्यात वाढ होऊ शकली नाही. शहर तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची दारू, मटका, अवैध दारूविक्री, वेश्या व्यवसाय, गांजा विक्री, धूमस्टाईल चोर्‍या, अवैध वाळू व्यवसाय, पेट्रोल, स्पेअरपार्ट चोरणे, सायकल चोरणे आदी व्यवसाय फोफावल्याचे चित्र आहे. त्यावर मात्र कुठलीही कारवाई केली जात नाही. यदाकदाचित कारवाई झालीच, तर ती थातूर-मातूर असते. पोलिस चिरीमिरी ठरवून घेतात. त्यामुळे संबंधित लोकांचे चांगलेच फावत आहे. शहरात तर पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर गांधी चौक परिसर, मुख्य रस्त्यावरील नगर पालिका व्यापारी संकुलातील काही दुकानात, गांधीनगर, तसेच विविध प्रभागांतून मटका किंग राजरोस मटका चालवतात याची माहिती पोलिसांना असूनही त्याबाबत कडक कारवाई होत नाही. अनेक तरुण, नागरिक झटपट लॉटरीमध्ये हजारो रुपये खर्च करतात. त्यामुळे तरुणपिढी बरबाद होऊ लागली आहे. त्यांच्यातील गुंड प्रवृत्त वाढत आहे, यावर कोणाचाच अंकुश नाही. 

शहरात छोटी-मोठी दुकाने, टपर्‍या फोडणे, मोबाईल चोर्‍या दररोज होतात. मात्र, पोलिसांत जाऊनही काही उपयोग होत नसल्याने नागरिक पोलिसांच्या कामकाजावर नाराज आहेत. शेकडो दुचाक्या काही चारचाकी गाड्या चोरीस गेल्या आहेत. पोलिस संबंधितांना दोन तीन दिवस तुम्हीच तपास करा, नाही सापडली, तर आमच्याकडे फिर्याद द्या, असा अजब सल्ला देतात. फिर्याद घेतलीच, तर तपास सुरू आहे या नावाखाली पोलिस फिर्यादीची दिशाभूल करतात. त्यामुळे पोलिसांत फिर्याद देण्यास नागरिकही कचरतात.दिवाळी सणानिमित्त सुट्ट्यांची संधी साधून अनेक चोरट्यांनी पाळत ठेऊन अनेक फ्लॅट, वसाहतीतील घरे फोडली. मोबाईल चोरीचे प्रमाण, तर इतके वाढले आहे, हे मोबाईल चोर कोण? आहेत हे पोलिसांना पक्की माहिती आहे. त्यावर कुठलीही कारवाई नाही. सोमवारचा आठवडे बाजार, तर मोबाईल चोरांना पर्वणीच ठरत आहे. ही सर्व आव्हाने आता जिल्हा विशेष शाखेतून येथे नव्याने येणारे अविनाश मोरे यांना पेलावे लागतील व आपला दरारा निर्माण करावा लागेल.