Fri, Sep 20, 2019 21:32होमपेज › Ahamadnagar › जिजामाता रुग्णालयाचा गलथान कारभार

जिजामाता रुग्णालयाचा गलथान कारभार

Published On: Feb 28 2019 1:12AM | Last Updated: Feb 28 2019 1:12AM
पिंपरी : प्रदीप लोखंडे

जिजामाता रुग्णालयात रुग्णांना अद्यापही व्हरांड्यातच सलाइन लावली जात आहे. सलाइन लावल्यानंतर त्या बाटलीची विल्हेवाट लावली जात नाही; तसेच रुग्णालयाच्या एका कोपर्‍यात औषधांच्या बाटल्यांचा खच पडला आहे. रुग्णालयीन प्रशासनाचा गलथान कारभार सुधारता सुधारेना झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयांची बिकट अवस्था आहे. गैरसुविधा आणि निष्काळजीपणाने वावरणारे कर्मचारी, यामुळे रुग्णांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. जिजामाता रुग्णालयाच्या गैरसुविधा थांबता थांबेना झाले आहे. रुग्णांची गैरसुविधा थांबविण्यासाठी नव्या इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. सुमारे दोन वर्षांपासून हे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे सध्या रुग्णालयाचे स्थलांतर जवळच्याच कमला नेहरू महापालिकेच्या शाळेजवळ करण्यात आले आहे. जिजामाता रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग व प्रसूती विभाग आहे. दिवसाला 150 ते 200 रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात. या ठिकाणी सध्या 6 खाटाच उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होताना दिसते. 

रुग्णालयाच्या व्हरांड्यातच बुधवारी (दि. 27) रुग्णाला सलाइन लावण्यात आली. सलाइन झाल्यानंतर सलाइनच्या बाटलीची विल्हेवाट लावणे गरजेचे असते. मात्र, रुग्णालयातील कर्मचारी तशीच बाटली ठेवत आहेत. रुग्णालयाच्या कोपर्‍यात औषधांच्या बाटल्यांचा खच पडला असून, त्याचीदेखील विल्हेवाट लावली नाही. त्यामुळे या ठिकाणी घाण साचली असून, डासांची निर्मिती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे रुग्णांच्या जिवावर बेतत आहे. याबाबत ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता तिरूमणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.