Mon, Jul 06, 2020 04:29होमपेज › Ahamadnagar › टँकर, टेम्पोचा भीषण अपघातात चालक ठार

टँकर, टेम्पोचा भीषण अपघातात चालक ठार

Published On: May 16 2019 2:03AM | Last Updated: May 16 2019 2:03AM
संगमनेर : प्रतिनिधी

पाण्याच्या रिकामा टँकर मागे घेत असताना अचानक भरघाव वेगाने आलेल्या आयशर कंपनीच्या टेम्पोची टँकरला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात टेम्पो चालक ठार झाला. ही घटना काल सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक  राष्ट्रीय महामार्गावरील कसारा दुमाला शिवारातील भुयारी मार्गावर घडली. विनोदकुमार सोनकर (वय 30, रा. मुंबई, मूळ रा. उत्तरप्रदेश) असे अपघातात ठार झालेल्या आयशर  टेम्पो चालकाचे नाव आहेे 

काल बुधवारी (दि. 15) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाने  आलेला पाण्याचा रिकामा टँकर (एम एच 43 वाय 2931)   संगमनेरच्या दिशेने वळवला जात होता. मात्र त्या  ठिकाणी वाहनांना वळणच घेता येत नसल्यामुळे टँकर चालकास पुन्हा आपला टँकर मागे घ्यावा लागला. त्याचवेळी नाशिकहून पुण्याच्या दिशेने निघालेला आयशर कंपनीच्या टेम्पो (एम एच 04 एच एस 1096) वरील चालकाचा  गोंधळ उडाल्यामुळे टेम्पोची टँकरला जोराची धडक  बसली. त्यात टँकर  जागेवरच पलटी झाला तर टेम्पो तेथून थेट कासारवाडीकडे उतरणार्‍या उपरस्त्यापर्यंत जाऊन दुभाजकावर आदळला व बाजूच्या मक्याच्या शेतात घुसला. या अपघातात टेम्पो चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दोन्ही वाहनांच्या धडकेने मोठा आवाज झाल्यामुळे नागरिकांनी व प्रवाशांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. आयशर टेम्पोतील दोघेही वाहनातच अडकल्याने मदतकर्त्यांनी वाहनाच्या काचा फोडून त्या दोघांना बाहेर काढले.

टोलवसुली करणार्‍या कंपनीची निष्काळजी

टोलवसुली करणार्‍या मोटोंकार्लो कंपनीने राहिलेल्या 30 टक्के कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी नाशिकचे दोन जण याच ठिकाणी झालेल्या अपघातात ठार झाले होते. त्यानंतर पुन्हा याच ठिकाणी गेल्या आठवड्यातही दुचाकी आणि मालट्रकच्या भिषण अपघातात आई-वडिलांसह तीन वर्षांच्या चिमुकलीचा अंत झाला होता. या अपघातात गंभीर जखमी असलेला एकजण अद्यापही मृत्युशी झुंज देत आहे.