Wed, Jun 26, 2019 02:00होमपेज › Ahamadnagar › दानवेंनी टाळली 300 कोटींची चर्चा!

दानवेंनी टाळली 300 कोटींची चर्चा!

Published On: Jan 05 2019 2:12AM | Last Updated: Jan 05 2019 12:12AM
नगर : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या 300 कोटींच्या निधीच्या आश्‍वासनाची पूर्तता कधी करणार? याचा जाब विचारण्यास आलेल्या प्रहार जनशक्‍ती संघटनेच्या आंदोलकांशी चर्चा करण्यास भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी नकार दिला. पोलिस बंदोबस्तात शासकीय विश्रामृहावर आणण्यात आलेल्या आंदोलकांना ‘मीडिया’चे कारण पुढे करत दानवेंनी चर्चा टाळली व तेथून काढता पाय घेतला.

प्रहार जनशक्‍तीचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, अजय महाराज बारस्कर यांनी 300 कोटींचा निधी वर्ग करण्याचे पत्र महापालिकेला न दिल्यास दानवेंची गाडी अडविण्याचा इशारा दिला होता. शुक्रवारी (दि.4) दुपारी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीगेट येथे आंदोलनही केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. सायंकाळी खा.दानवे शासकीय विश्रामगृहावर आल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्तात आंदोलकांना विश्रामगृहावर आणले. आंदोलक चर्चेसाठी आले असल्याचा निरोपही खा.दिलीप गांधी यांच्या मार्फत खा.दानवे यांना देण्यात आला होता. पत्रकार परिषद संपल्यावर बाहेर आल्यावर आंदोलकांनी दानवे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मीडिया समोर असल्याचे कारण देत त्यांनी चर्चा करणे टाळले व पोलिस बंदोबस्तातच ते महापालिकेकडे रवाना झाले. पत्रकार परिषदेनंतर घडलेल्या या प्रकाराची उपस्थितांमध्ये चर्चा रंगली होती. भाजपाने जिथे-जिथे आश्‍वासने दिली, तिथे निधी दिलेला आहे. नगर  मनपाची स्थिती सुधारण्यासाठी आम्ही 300 कोटींच्या निधीचा दिलेला शब्दही खरा करुन दाखणार, असा दावा दानवे यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. या आश्‍वासनाची पूर्तता कधीपर्यंत होईल, या प्रश्‍नावर बोलणे मात्र त्यांनी टाळले.