Tue, Sep 17, 2019 03:37होमपेज › Ahamadnagar › छावण्यांसाठी आंदोलनाची गरजच नाही

छावण्यांसाठी आंदोलनाची गरजच नाही

Published On: Feb 24 2019 12:01AM | Last Updated: Feb 24 2019 12:01AM
नगर : प्रतिनिधी

ज्या ज्या ठिकाणी चारा छावण्यांची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी त्या सुरु करणारच आहोत, त्यासाठी आंदोलने, निदर्शनाची गरज नाही, असा टोला पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मित्रपक्ष असणार्‍या शिवसेनेबरोबरच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना लगावला आहे. 

प्रधानमंत्री, रमाई, शबरी व पारधी आवास योजनेतंर्गत घरकूलांसाठी पात्र भूमिहीन लाभार्थ्यांना शासकीय जमीन विनामूल्य वितरण व अतिक्रमण नियमानुकूल आदेशाव्दारे नियोजन भवनात काल (दि.23) पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते 158 घरकूल लाभार्थ्यांना शासकीय जागांच्या पटट्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खा. दिलीप गांधी, आ. बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक परिक्षित यादव आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाभरात एकूण 12 हजार 203 जण घरकूल लाभार्थी आहेत. यांना घर बांधणीसाठी जागा उपलब्ध नाही. तसेच 1 हजार 776 जणांनी सरकारी जागेवर अतिक्रमण करुन राहू लागले आहेत.  जिल्हा प्रशासनाने 110 लाभार्थ्यांना घरकूलासाठी जमीन तर अतिक्रमण केलेल्या 42 व्यक्‍ती अशा एकूण 158 लाभार्थ्यांना घरकूलबांधणीसाठी प्रत्येकी पाचशे स्केअर फूट शासकीय जागा उपलब्ध करण्याचा निर्णय झाला. त्याानुसार पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्याा हस्ते लाभार्थ्यांना जागेच्या मालकीचे प्रमाणपत्र अदा करण्यात आले.

पालकंत्री प्रा. शिंदे पुढे म्हणाले की, 2022पर्यंत सर्वासाठी निवारा ही योजना पूर्ण केली जाणार आहे. त्यासाठी जागा उपलब्ध केली आहे. जे बेघर आहेत. पिढ्यानपिढ्या सरकारी जागेवर अतिक्रमण करुन राहात आहेत. अशा व्यक्‍तींना स्वत:च्या मालकीचे घर उपलब्ध व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा पारित केला. त्यानुसार आज 158 जणांना जागेचे प्रमाणपत्र उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. 70 वर्षानंतर  दारिद्रयरेषेखाालील जीवन जगणार्‍या जनतेला आता स्वत:च्या मालकीच्या घराचा उतारा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्हा दुष्काळात होरपळत आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांवर दोन हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. टँकर व छावण्या सुरु केल्या जाणार आहेत. आवश्यक त्या ठिकाणी त्या सुरुच होणार आहेत. त्यामुळे आंदोलने, निदर्शने आदी विविध प्रकारच्या आंदोलनाची गरज नसल्याचा सल्‍ला देखील त्यांनी नाव न घेता शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस व काँग्रेस पक्षांच्या पदाधिकार्‍यांना लगावला आहे.यावेळी खा. दिलीप गांधी, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांची भाषणे झाली. झेडपीचे सीईओ माने यांनी प्रास्ताविक केले.डीआरडीएचे साळवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex