Mon, Aug 19, 2019 20:22होमपेज › Ahamadnagar › रिव्हॉल्व्हर रोखून पाच लाख लांबविले

रिव्हॉल्व्हर रोखून पाच लाख लांबविले

Published On: Oct 30 2018 1:31AM | Last Updated: Oct 30 2018 1:31AMनान्नज : वार्ताहर 

जामखेड येथील व्यावसायिकावर रिव्हॉल्व्हर रोखून, दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील पाच लाखांची रोकड असलेली बॅग लांबविली. रविवारी (दि.28)रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी जामखेड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. 

जामखेड शहरातील जुन्या बसस्थानकाजवळ बलराम बन्सीलाल आहुजा यांचे आहुजा वाईन शॉप नावाने दुकान आहे. रविवारी (दि.28) रात्री पावणेअकरा वाजता दुकान बंद करून ते मोटारसायकलवरून घरी जात होते. त्याचवेळी तपनेश्वर रस्त्यावरील पंडित ज्वेलर्सजवळ पाठीमागून आलेल्या विनानंबरच्या काळ्या रंगाच्या हिरो होंडा शाईन मोटारसायकलवरील दोन अनोळखी इसमांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. आहुजा यांनी मोटारसायकल थांबविली असता, त्यातील पाठीमागे बसलेल्या एकाने खाली उतरून त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखले. तर दुसरा आरोपी गाडीवरच होता. यानंतर आहुजा यांच्या मोटरसायकलच्या हॅण्डलला असलेली बॅग हिसकावून घेऊन चोरटे मोटारसायकलवरून वेगाने पसार झाले. बॅगेमध्ये 5 लाख 15 हजार रुपये होते. चोरट्यांपैकी एकाने हेल्मेट घातलेले होते, तर दुसर्‍याने तोंडाला मास्क लावलेला होता.

या घटनेनंतर घाबरलेल्या बलराम आहुजा यांनी झालेल्या प्रकाराची माहिती मोठे बंधू  कृष्णा आहुजा यांना मोबाईलवरून सांगितली. त्यानंतर बलराम आहुजा यांच्या जामखेड पोलिस ठाणे गाठले. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव सहारे हे करत आहेत. दरम्यान, जामखेड शहरासह तालुक्यात  सर्रास गावठी कट्टे, पिस्तूल बागळणार्‍यांनी कायदा सुव्यवस्थेला मोठे आव्हान दिले आहे. तालुक्यात लूटमारीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.