Sat, Sep 21, 2019 06:50होमपेज › Ahamadnagar › विजयी उमेदवार दुपारीच घेणार अंगावर गुलाल

विजयी उमेदवार दुपारीच घेणार अंगावर गुलाल

Published On: May 23 2019 1:36AM | Last Updated: May 23 2019 1:36AM
नगर : प्रतिनिधी

नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, आज सकाळीच आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. मतदान यंत्रातील (ईव्हीएम) मतांची मोजणी दुपारी 3 वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारीच विजयी उमेदवाराचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या दोन्ही मतदारसंघातील मतमोजणी शांततेत आणि विना अडथळा पार पाडावी, यासाठी वखार महामंडळाच्या गोदाम परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला असल्याचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

नगर मतदारसंघाची निवडणूक 23 मे रोजी झाली असून, या मतदारसंघातील 11 लाख 91 हजार 521 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला आहे. शिर्डी मतदारसंघाची निवडणूक 29 एप्रिल रोजी झाली असून, या मतदारसंघातील 10 लाख 22 हजार 461 मतदारांनी मतदान केले आहे. या दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी नगर एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या दोन वेगवेगळ्या गोदामांत होणार आहे. मतमोजणी मात्र विधानसभा मतदारसंघनिहाय होणार आहेत. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी 14 टेबलवर होणार आहे. त्यासाठी नगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी प्रत्येकी 84 टेबलांवर होणार असल्याचे जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी सांगितले. 

आज पहाटेच पावणेसहा वाजता उमेदवारांच्या उपस्थितीत दोन्ही गोदामांतील स्ट्रॉगरुम उघडून मतदान यंत्रे (ईव्हीएम) मोजणीसाठी बाहेर काढली जाणार आहेत. प्रारंभी टपाली मतपत्रिकांची मोजणी होणार आहे. यामध्ये लष्करी जवानांकडून आलेल्या मतपत्रिकांचा देखील समावेश आहे. 

 ‘लष्करी’ मतपत्रिकांना वेळ लागणार 

लष्करी जनावारांना मतदानाचा हक्‍क बजावण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने प्रथमच ईटीपीबीएस ही सेवा उपलब्ध करुन दिली. निवडणूक कामासाठी नियुक्‍त अधिकारी व कर्मचारी यांनी टपालाव्दारे मतदान केले आहे. ते आणि लष्करी जवानांच्या मतपत्रिका आज सकाळी सात वाजेपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. दरम्यान, लष्करी जवानांकडून आलेल्या मतपत्रिकांच्या बारकोडची तपासणी केली जाणार आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ असणारी आहे. त्यामुळे थोडा वेळ लागणार असल्याचे जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी सांगितले.

चिठठयांही वेळखाऊ 

या दोन्ही प्रकारच्या टपाली मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम मतांची मोजणी होणार आहे. पहिल्या तीन फेर्‍यांची मतमोजणी करण्यासाठी  विलंब लागणार आहे. त्यानंतर मात्र प्रत्येक 15 ते 20 मिनिटानंतर फेरीनिहाय मतमोजणी जाहीर केली जाणार आहे. अंदाजे दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत ईव्हीएम मतमोजणी पूर्ण होणार आहे. त्यानंतर सर्वात शेवटी दोन मतदारसंघांतील प्रत्येकी 60 मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या चिठठया मोजल्या जाणार आहेत. एका विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या चिठठया मोजण्यासाठी किमान एक तासाचा अवधी लागणार आहे. त्यामुळे सहा विधानसभा मतदारसंघातील चिठ्या मोजण्यासाठी सहा -सात तासांचा अवधी लागणार आहे.व्हीव्हीपॅट चिठठ्यांची मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे हा निकाल जाहीर होण्यासाठी रात्रीचे दहा-अकरा वाजण्याची शक्यता आहे.

ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश नाही

मतमोजणीसाठी नियुक्‍त अधिकारी व कर्मचारी यांना ओळखपत्र दिले आहेत. या ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आदींना देखील ओळखपत्र बंधनकारक आहे. प्रत्येकांची तपासणी केली जाणार आहे. उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी देखील ओळखपत्र जवळ बाळगावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी केले आहे.