Sun, Aug 18, 2019 06:01होमपेज › Ahamadnagar › रेशनकार्डधारकांची संख्या वाढणार

रेशनकार्डधारकांची संख्या वाढणार

Published On: Feb 12 2019 1:04AM | Last Updated: Feb 12 2019 12:28AM
नगर : प्रतिनिधी

दुष्काळी गावांतील ज्या कोणा नागरिकांकडे शिधापत्रिका उपलब्ध नाहीत, अशा नागरिकांना त्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने नियोजन केले आहे. तहसीलदारांना देखील याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांच्या संख्येत वाढ होणार आहे.

शासनाने राज्यातील 151 तालुक्यांके, 268 महसुली मंडळांंव्यतिरिक्‍त 931 गावांत दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. यामध्ये नगर जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 421 गावांचा समावेश आहे. दुष्काळ जाहीर झालेल्या या गावांत सवलतीतील अन्‍नधान्याचा लाभ मिळत नसलेल्या पात्र नागरिकांना सवलतीच्या दराने अन्‍नधान्याचा लाभ मिळणे सोयीस्कर व्हावे, यासाठी शासनाने 8 फेब्रुवारी 2019 रोजी अध्यादेश जारी केला आहे.

दुष्काळी गावांतील राष्ट्रीय अन्‍नसुरक्षा योजनेत समाविष्ट न झालेली परंतु पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका धारण करीत असलेली जी व्यक्‍ती सवलतीच्या दराने अन्‍नधान्य मिळण्यास पात्र ठरविण्याची मागणी करेल, अशा नागरिकांना त्यांच्या उत्पन्‍नाच्या व इष्टांकाच्या मर्यादेत अंत्योदय अन्‍न योजना व प्राधान्य कुटंबातील लाभार्थ्यांना लवकरच राष्ट्रीय अन्‍नसुरक्षा योजनेत समावेश करा, दुष्काळामुळे ग्रामीण भागातील नागरिक शहरी व निमशहरी भागांत स्थलांतर करत आहेत.पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या स्थलांतरीत ठिकाणी अन्‍नधान्य उपलब्ध होईल. तसेच स्थलांतरणामुळे त्यांना त्यांच्या हक्‍काच्या अन्‍नधान्यापासून वंचित राहावे लागू नये, याची जिल्हा पुरवठा विभागाने दक्षता घ्यावी, असे आदेश शासनाने दिले आहेत. 

या आदेशानुसार प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी जितेंद्र इंगळे यांनी तहसीलदारांना आदेश दिले आहेत. अन्‍नसुरक्षा योजनेत आतापर्यंत समावेश झाला नसलेले आणि निकषांत बसणार्‍या नागरिकांचा या योजनेचा लाभ मिळावा यासाठी तहसील कार्यालयाच्या वतीने काम सुरु झाले असल्याचे त्यांनी सांगितले.