कर्जत : प्रतिनिधी
पाणी वाहतूक करणारा मिनी टँकर आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर जोराची धडक होऊन, झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. नगर-सोलापूर रस्त्यावर कर्जत तालुक्यातील माहिजळगाव चौफुला येथे काल (दि. 14) सकाळी साडेदहाच्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे.
मेघा यादव (वय 52, रा.गांधीधाम, कच्छ, गुजरात) व युवराज डाडर (वय 24, रा. पाटेगाव, ता. कर्जत) अशी या अपघातात ठार झालेल्या दोन्ही वाहनांच्या चालकांची नावे आहेत. तर मिनी टँकरमधील अमोल डाडर (वय26), जनार्दन डाडर (वय 18, दोघे रा. पाटेगाव, ता. कर्जत) व दादा दळवी (वय 25, रा. शेवगाव, ता. शेवगाव, जि. नगर) हे तिघे जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर प्रथम माहिजळगाव येथील खासगी दवाखान्यात प्रथमोपचार करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी त्यांना नगर येथे हलविण्यात आले आहे. या जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, नगरहून घराच्या छताचे पत्रे घेऊन हा कंटेनर (क्र. जीजे 12 बीव्ही 4277) सोलापूरच्या दिशेने चालला होता. तर समोरून माहिजळगावकडे पाणी भरून पाण्याचा टँकर येत होता. या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेमुळे कानठाळ्या बसणारा आवाज झाल्याने ग्रामस्थांनी त्या दिशेने धाव घेतली. या वेळी कंटेनरचा चालक स्टेरिंगमध्ये अडकलेला होता. त्याचे पाय कमरेखालून निकामी झाले होते. त्याचे अर्धे शरीर गाडीची समोरची काच फोडून बाहेर आले होते. तो मृतदेह अशाच अवस्थेमध्ये काही तास लटकलेला होता. तर मिनी टँकरचा चालक रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर खाली पडलेला होता. हे दृश्य अतिशय विदारक होते. दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता.
अपघातानंतर रस्त्याच्या मधोमध दोन्ही वाहने अडकल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. यामुळे नगर-सोलापूर महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. उशिरा क्रेन आणून वाहनांमध्ये अडकलेले मृतदेह यंत्रांच्या साहाय्याने पत्रे कापून बाहेर काढल्यानंतर, ही दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला घेण्यात आली. पोलिस निरीक्षक वसंत भोये यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. काही तासांनंतर या महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.