Mon, Sep 16, 2019 05:31होमपेज › Ahamadnagar › नगरमधील कलाकारांनी घेतली सांस्कृतिक क्षेत्रात गगन भरारी

नगरमधील कलाकारांनी घेतली सांस्कृतिक क्षेत्रात गगन भरारी

Published On: Dec 29 2018 1:35AM | Last Updated: Dec 29 2018 1:35AM
सांस्कृतिक नगर :  गोरक्षनाथ बांदल

नगर जिल्हा हा जसा साधू-संताचा आहे, तसाच तो विविध कार्यक्षेत्रात चमकलेल्या कलाकारांचाही  आहे. त्यात खेळ असो किंवा गायन, संगीत, साहित्य, नाट्य, चित्रकला अशा कलेच्या सर्वच क्षेत्रामध्ये नगरच्या कलाकरांनी आपल्या कलेचा ठसा उमटविला आहे. दिग्गज कलाकरांचा वारसा नवोदित कलाकरांनी मोठ्या ताकदीने पुढे नेला आहे. नगरच्या कलाकरांचा यशाचा आलेख उंचविणारी कामगिरी 2018 मध्ये सांस्कृतिक क्षेत्रात गगन भरारी घेऊन नगरच्या नावलौकिकात मोठी भर घातली आहे. 

त्यात गायन क्षेत्रात अंजिला व  नंदिनी गायकवाड यांचे उत्तुंग यश आहे,साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख यांनीही एक वेगळा साहित्याचा प्रवाह आणला. नाटयक्षेत्रात तर अलिकडे यशाची नवी परंपराच निर्माण होत आहे.रंगकर्मी मोहनीराज तथा राजू गटणे असतील नवोदित  बालकलाकार सर्वज्ञा कराळे हिने  मिळविलेले  यश नेत्रदीपक आहे.अलिकडे भरविले जाणारे साहित्य संमेलने तर ही नगरची नवी ओळख आहे. त्याचा  पाया  घातला तो शब्दगंध साहित्य संमेलनाने. पाथर्डीचे कृष्णा साहित्य संमेलनही याच पठडतील. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. नवीन चित्रपट जिल्ह्यातील कलाकार बनवत  आहे तर काही दूरदर्शन मालिकाही बनवून एक नवा इतिहास निर्माण करीत आहेत.याशिवाय शहरातील अनेक प्रसिद्ध संस्था  ज्या व्याख्यानमाला ठेवतात तोही नगरकरांचा एक सांस्कृतिक ठेवाच आहे. एकूणच वर्षभरील सांस्कृतिक नगरचा हा घेतलेला आढावा.

गायनः अंजली व नंदिनी गायकवाड या दोघी बहिणींनी गायनाच्या माध्यमातून राज्य व  राष्ट्रीयस्तरावर नगरचे नाव उंचविले. ‘झी’ वाहिनीच्या सारेगमप लिटिल चॅम्प या राष्ट्रीय स्पर्धेत अंजली गायकवाड हिने प्रथम क्र मांक मिळवून नगरच्या नावलौकिकात भर घातली. देश पातळीवर गायन क्षेत्रात नगरचे देशपातळीवर उंचविले.

नाट्यः नाट्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा ‘पुरुषोत्तम करंडक’ सारडा महाविद्यालयाच्या ‘पीसीओ’ या एकांकिकेने पटकविला. वीस वर्षांनंतर नगरच्या संघाने हा करंडक पटकविला आहे. एका मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेत नगरचे हरहुन्नरी रंगकर्मी मोहनीराज तथा राजू गटणे यांनी मध्यवर्ती भूमिका साकारून तसेच याच वाहिनीवर सुरू असलेल्या ‘बाजी’ या मालिकेत भक्‍ती डांगे हिनेही पर्दापणात चांगली भूमिकेने नाट्य क्षेत्राचा नावलौकिक वाढविला.गेल्या वर्षी शासनाच्या बालनाटय स्पर्धेत सर्वज्ञा कराळे हिने अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळवून तसेच या वर्षी नगर केंद्रावर सादर झालेल्या राज्यनाटय स्पर्धेत अशुद्ध बिजापोटी या नाटकासाठीही तिला अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र जाहीर झाले असून तिची  या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.अहमदनगर महाकरंडक, अक्षर करंडक, नाट्य परिषदेची एकांकिका स्पर्धा, स्वगत स्पर्धा, शाहू मोडक एकांकिका स्पर्धा, कांकरिया करंडक अशा विविध स्पर्धांतून अनेक कलावंत रंगभूमीसाठी तयार झाले असून नगरचे नावलौकिक वाढविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

चित्रपटः भाऊराव कर्‍हाडे यांनी दिग्दर्शित केलेल्या‘ बबन’ या चित्रपटात मुख्य कलाकर भाऊसाहेब शिंदेसह अनेक स्थानिक कलाकरांना संधी दिली. या कलाकरांनीही या संधीचे सोने करत या स्थानिने बॉक्स ऑफिसला उत्तुंग कमाई केली. खडकी येथील महेश काळे यांनी दिग्दर्शित केलेला ‘ घुमा’ हा चित्रपटही नगरच्याच मातीतला. मिलिंद शिंदे दिग्दर्शित व निर्मित ‘रेराया’ या चित्रपटाची नगर शहर व परिसरात निर्मिती केली. अहमदनगर फिल्म कंपनी यांची निर्मिती असलेला दिग्गज कलावंताचा समावेश असलेला अस्सल नगरी मातीतील चित्रपटाची निर्मिती पूर्णत्वाकडे पोहचली आहे. रिमा अमरापूरक यांनीही नगरचे भूमीपुत्र व भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी पुरुषोत्तम भापकर यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘पुरुषोत्तम’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या वतीने ही फेब्रुवारी महिन्यात ‘प्रतिबिंब’ हा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला. या फेस्टिव्हल अनेक चित्रपट निर्मात्यांसाठी पहिली संधी ठरत आहे. किरण बेरड यांच्या ‘गावरान मेवा’ या वेबसिरिजनेही अनेक स्थानिक कलावंतांना संधी देत हक्काचा रसिकवर्ग तयार केला. 

साहित्य संमेलनेः शब्दगंध साहित्य परिषदेच्या जानेवारी महिन्यात तेरावे राज्यस्तरीय साहित्य संमेलन सावेडीतील कोहिनूर मंगल कार्यालयात पार पडले.त्याच दरम्यान शेवगाव येथे बालकुमार साहित्य संमेलन ही झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) विभागीय साहित्य संमेलन नगरला भरविले. चर्चासत्र, प्रकट मुलाखती आदींच्या माध्यमातून विविध पैलूंवर प्रकाश पडला. मसापाने पावसाळी काव्यसंमेलन सावेडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारकात आयोजित करून विविध उपक्र मात सातत्य राखले. बेलवंडी येथे वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज साहित्य संमेलनाची परंपरा कायम राखली. पाथर्डी येथे ही अशोक व्यवहारे यांनी ‘कृष्णा भोजनालय’ मार्फत साहित्य संमेलनाची परंपरा कायम ठेवली.

धार्मिक परीक्षा बोर्डमार्फत ही दरवर्षी व्याख्यानमाला आयोजित केली जाते. या वर्षी ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांची गाण्यांची मैफल आयोजित केली होती. पद्मश्री विखे पाटील फौंडेशनच्या वतीने लोणी येथे दरवर्षी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांना ‘ डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील ’ साहित्य पुरस्काराने गौरविले जाते. कोपरगाव येथे भि.ग.रोहमारे साहित्य पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे. 

ज्येष्ठ साहित्यिक व माजी खा. यशवंतराव गडाख यांच्या पुढाकारातून सोनई (ता.नेवासा) येथे सात दिवसांच्या साहित्य मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य संमेलन, लोककलांची रेलचेल होती. रसिक ग्रुपच्या वतीने नगरला गुढीपाडवा महोत्सवाची रसिक चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. नामांकित कलावंता यामध्ये सहभागी होत असतात. प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी गोवा महोत्सवात सहभागी होऊन नगरचा नावलौकिक वाढविला. पाथर्डी येथील शीतल गोरे यांनी पुण्यातील बालगंधर्व कलादालनात चित्र प्रदर्शन करून महानगरांमध्ये आपल्या कलेचा ठसा उमटविला.