Mon, Sep 16, 2019 12:32होमपेज › Ahamadnagar › दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

Published On: Feb 02 2019 1:29AM | Last Updated: Feb 01 2019 10:02PM
शेवगाव/टाकळी ढोकेश्वर : प्रतिनिधी 

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेवगाव व पारनेर तालुक्यातील दोघा शेतकर्‍यांनी एकाच दिवशी विष पिऊन आत्महत्या केली. दुष्काळ, नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू असून, या घटनांमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शेवगाव तालुक्यातील सुकळी येथील बबन आसराजी भवर (वय 58) या शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. विशेष म्हणजे त्यांचा मुलगा मच्छिंद्र बबन भवर याने दीड वर्षापूर्वी याच कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. एकाच कुटूंबात कर्जबाजारीपणाने दोन जणाने आत्महत्या केल्याने सुकळी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

मच्छिंद्र याने आत्महत्या केल्यानंतर कुटूंबाने उदरनिर्वाहासाठी हिंदूजा फायनान्सकडून कर्ज घेऊन एक टॅम्पो रिक्षा घेतलेली होती. तिचेही 80 हजार रुपये देणे बाकी होते. तर खासगी सावकाराचेही कर्ज होते. यासर्वांचे वारंवार तगादे येत असल्यामुळे आलेल्या नैराशातून त्यांनी रविवारी रात्री विषारी औषध प्राशन केले. त्यांच्यावर येथील नित्यसेवा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी रात्री 11.30 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पारनेर तालुक्यातील पोखरी येथील संतोष धोंडीभाऊ कसबे (वय 35) या तरुण शेतकर्‍याने नेहमीच पडणारा दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विष पिऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना गुरूवार दि.31 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली.वडिलांचे लहानपणीच निधन झाल्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच होती.