Mon, Sep 16, 2019 06:30होमपेज › Ahamadnagar › एसटी-टँकरची समोरासमोर धडक : एक ठार, ७ जखमी      

एसटी-टँकरची समोरासमोर धडक : एक ठार, ७ जखमी      

Published On: May 09 2019 1:49AM | Last Updated: May 09 2019 1:49AM
बोधेगाव : वार्ताहर  

शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर सोनविहीर फाट्याजवळ मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास एसटी बस व पाण्याच्या टँकरची समोरासमोर टक्कर होऊन टँकरचा चालक जागीच ठार झाला. बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नगरला हलविण्यात आले आहे. 

गेवराई आगाराची पुणे-गेवराई ही बस (क्रमांक एमएच 20 बीएल1330) ही एसटी बस गेवराईकडे जात होती. पाण्याचा टँकर बोधेगाववरून गदेवाडी फाट्यानजिक जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी भरण्यासाठी चालला होता. या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन आपघात झाला. यात टँकरचा चालक दत्तात्रय तुकाराम  राजळे (वय 36, रा. मठाचीवाडी ता. शेवगाव) हा जागीच ठार झाला, तर बसचालक सीताराम चंद्रसेन उघडे (रा. खडकी, ता. गेवराई) हा गंभीर जखमी झाला. बसमधील प्रवासी राणी अशोक जाधव (वय 28,  गेवराई, जि. बीड), नितीन ज्ञानेश्‍वर एडके (वय 25, रा .धोंडराई, ता. गेवराई, जि. बीड), सुभाष कोंडीराम लोखंडे (वय 45,  जुने दहिफळ, ता. शेवगाव), गोरख अंबादास गुंजाळ (वय 66, गेवराई). रमेश बाबूराव पवार (वय 34, जातेगाव ता. गेवराई), बाबासाहेब आहेरकर (वय 44, गायकवाड जळगाव, ता. शेवगाव) हे प्रवासी गंभीर जखमी झाले. शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जखमींना नगर येथे पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक परदेशी यांनी दिली. अपघात झाला त्यावेळी दोन्ही वाहनांची मोठा आवाज झाला. या आवाजाने सोनविहीर फाट्यावरील लोक जागे झाले आणि त्यांनी अपघात स्थळी धाव घेतली. तसेच बोधेगावच्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मिळेल त्या वाहनांनी शेवगाव, बोधेगाव, चापडगावच्या दवाखान्यांत पाठविले. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शेवगावचे पोलिस उपनिरीक्षक भारत काळे व बोधेगाव पोलिस दूर क्षेत्राचे सहायक फौजदार वामन खेडकर, पोलिस हवालदारबबन राठोड, , आसाराम बटुळे यांनी घटनास्थळी धाव घेवुन बस आणि टँकरच्या केबिन एकमेकात गुंतल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी जेसेबीच्या मदतीने वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.