होमपेज › Ahamadnagar › आरटीओ कार्यालयासमोरच नियमांना हरताळ

आरटीओ कार्यालयासमोरच नियमांना हरताळ

Published On: Feb 09 2019 12:50AM | Last Updated: Feb 08 2019 11:01PM
नगर : गणेश शेंडगे

प्रवासी व मालवाहतुकीच्या वापरासाठी असलेल्या वाहनांतच एजंटांनी थेट दुकानेच थाटली आहेत. झेरॉक्स, संगणकावर ऑनलाईन फार्म भरून देणे, विविध परवाने मिळवून देण्याचे काम या वाहनांतून चालते. त्यामुळे काही वाहनांचे मूळ आकारही बदलण्यात आलेले आहेत. ही वाहने रस्त्याच्या बाजूला उभी करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. विशेष म्हणजे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरच अशा पद्धतीने मोटार वाहन कायद्याला हरताळ फासला जात आहे. 

सध्या जिल्ह्यात वाहतूक सुरक्षा सप्ताहाचा आयोजित करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच वाहतूक सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. या सप्ताहात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जनजागृतीसाठी काही प्रभावी उपक्रम राबविण्याची अपेक्षा असते. मात्र, उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना त्यांच्याच आवारात वाहतूक नियमांची अंमलबजावणी करता येत नाही. त्यांच्याकडून वाहतूक सुरक्षेची काय अपेक्षा करायची, असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. रस्त्याच्या कडेला टपर्‍या थाटल्यास अतिक्रमण विरोधी पथक कारवाई करेल, म्हणून एजंटांनी आता वाहनांमध्येच दुकाने थाटली आहेत. वाहनांत झेरॉक्स मशीन आहेत. तसेच लॅपटॉपवर ऑनलाईन फॉर्म भरून दिले जातात. प्रवासी वाहतूक करणार्‍या ओम्नी व मालवाहतूक करणार्‍या टेम्पोचा वापर दुकानांसाठी केला जातो. त्यांच्या दुकानदारीचे फलकही लावले आहेत. तसेच एका एजंटने तर थेट रस्त्याच्या कडेला टेम्पोतच ऑफीस थाटले आहे. त्यात टेबल, खुर्च्यांसह बसण्यासाठी बाके आदींची व्यवस्था आहे. काम ओटापल्यानंतर दुकान बंद करून तेथेच पार्किंग केले जाते. 

रस्त्याच्या साईडपट्टीवर वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने वाहने उभी केली आहेत. ही वाहने ना परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांना दिसतात, ना शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या नजरेत येतात. दुसर्‍याला वाहतूक नियमांचे धडे देणार्‍या उपप्रादेशिक विभागालाच्या कार्यालयासमोरच वाहतूक नियमांना हरताळ फासला आहे. ही दुकाने एजंटांची आहेत. म्हणून त्यांच्याविरुद्ध कारवाईची करण्याची हिंमतची कोणी दाखवयाला तयार नाही. सामान्य नागरिकांना नियम शिकविणारे प्रशासन एजंटांना कायदा दाखविण्याची हिंमत का करीत नाही, असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही.
 
वाहनाचा मूळ आकार बदलल्यास वाहनांची नोंदणी कायमस्वरुपी रद्द केली जाऊ शकते, असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिलेला आहे. प्रवासी व मालवाहतुकीसाठी असलेल्या वाहनांचा वापर दुकानांसाठी करणेही बेकायदेशीर आहे. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे. तसेच रस्त्याच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने वाहने उभी केल्यास त्यांच्याविरुद्ध परिवहन विभाग व पोलिसांनी कारवाई करायला हवी. 
- अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील
विशेष सरकारी वकील, महाराष्ट्र राज्य

..हा ‘स्नेह’ कशासाठी?

सामान्य वाहनचालकांना नियम शिकविणारे, त्यांना मोटार वाहन कायद्याचा बडगा दाखविणारे प्रशासन एजंटांनी मालवाहतूक, प्रवासी वाहनांचा वापर दुकानांसाठी करूनही त्यांच्याविरुद्ध कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नाही. विशेष म्हणजे हे दृश्य आरटीओ कार्यालयासमोरच आहे. प्रशासनाचा हा विशेष ‘स्नेह’ नेमका कशासाठी आहे, असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही.