होमपेज › Ahamadnagar › उमेदवारी आधीच इच्छुकांच्या नगरमध्ये भेटीगाठी शिगेला

उमेदवारी आधीच इच्छुकांच्या नगरमध्ये भेटीगाठी शिगेला

Published On: Mar 16 2019 8:06PM | Last Updated: Mar 16 2019 8:32PM
नगर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (ता.१६) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार आमदार अरुण जगताप यांनी राहुरी तालुक्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या,कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. दुसरीकडे भाजपचे संभाव्य उमेदवार डॉ.सुजय विखे यांनी थेट राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. पारनेर तालुक्यातील नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार विजय औटी तसेच भाजप कार्यकर्ते यांची भेट विखे यांनी घेऊन शिवसैनिकांशी चर्चा केल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्या, तरी अजूनही भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरमधील उमेदवार जाहीर झालेला नाही. यामुळे कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहचला आहे. विखे भाजपमध्ये गेल्यानंतर सत्ता संघर्षाला चांगलेच तोंड फुटले आहे. कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांची अवस्था सैरभर झाली असून काही कार्यकर्ते आघाडी धर्म म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रचार करणार आहेत तर काही कार्यकर्ते भाजपच्या उमेदवार विखे यांना मदत करण्याची शक्यता आहे. यामुळेच आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण दिसते.

दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार दिलीप गांधी हे अजूनही उमेदवारीसाठी आशावादी आहेत. त्यांच्यासाठी जैन समाजाने पंतप्रधान मोदी यांना साकडे घातले आहे. भाजपने गांधी यांच्या नावाचा विचार न केल्यास समाज वेगळा निर्णय घेईल, असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे विखे यांना अगोदर जैन समाजाची मनधरणी करावी लागणार आहे, असे दिसते. एकूणच अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नसली तरी दोन्ही पक्षांकडून निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex