Mon, Sep 16, 2019 05:58होमपेज › Ahamadnagar › मतदान लाईव्ह वेबकास्ट!

मतदान लाईव्ह वेबकास्ट!

Published On: Apr 19 2019 1:45AM | Last Updated: Apr 18 2019 11:32PM
नगर : प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील  संवेदनशील असे 366 मतदान केंद्रांवर वेबकास्टींग केले जाणार आहे. त्यामुळे या केंद्रांवरील दिवसभरातील मतदान प्रक्रिया कशी सुरु आहे, हे भारत निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक निरीक्षक  यांना कार्यालयांत बसून पाहाता येणार आहे. नगर मतदारसंघात 192 तर शिर्डी मतदारसंघातील 174 केंद्रांचा यामध्ये समावेश आहे.
आधुनिक तंत्रज्ञानात दिवसेंदिवस बदल होत आहे. या तंत्रज्ञानामुळे अशक्य गोष्ट शक्य होऊ लागली आहे. एखाद्या गावाची मतदान प्रक्रिया कशी सुरु आहे, हे दिल्‍लीतील भारत निवडणूक आयोगाचे आयुक्‍त वा इतर अधिकारी यांना कार्यालयात बसून पाहाता येणार आहे. यासााठी भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर वेबकास्टींगचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या लोकसभा निवडणुकीत याचा श्रीगणेशा होत आहे. जिल्हाभरातील एकूण मतदान केंद्रांच्या 10 टक्के मतदान केंद्रांवर या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. 

जिल्हाभरात एकूण 3 हजार 722 मतदान केंद्र आहेत. त्यापैकी 10 टक्के म्हणजे 366 मतदान केंद्रांतील मतदान प्रक्रिया लाइव्ह वेबकास्ट करण्यात येणार आहे. निवडण्यात आलेली मतदान केंद्रे ही संवेदनशील असणारी आहेत. 23 एप्रिल रोजी नगर मतदारसंघात निवडणूक होत आहे. या मतदारसंघातील 192 मतदान केंद्रांवर वेबकास्ट केले जाणार आहे. नगर शहर मतदारसंघातील 30 मतदान केंद्रांवर ही सुविधा असणार आहे. नगर शहरातील सावेडी येथील सहा, बोल्हेगाव येथील एक, भिंगार येथील 12, माळीवाडा येथील चार, चाहुराणा येथील एक तर केडगाव येथील सहा मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाईव्ह वेबकास्ट होणार आहे.

वेबकास्टींग केंद्रांची संख्या

नगर मतदारसंघ 

शेवगाव-पाथर्डी 37, राहुरी 30, पारनेर 25, नगर शहर 30, श्रीगोंदा 34, कर्जत-जामखेड 36

शिर्डी मतदारसंघ 

अकोले 31, संगमनेर 28, शिर्डी 30, कोपरगाव 27, श्रीरामपूर 31, नेवासा 27.