Sat, Jun 06, 2020 14:53होमपेज › Ahamadnagar › शेतकर्‍यांनी कांद्याचे लिलाव पाडले बंद 

शेतकर्‍यांनी कांद्याचे लिलाव पाडले बंद 

Last Updated: Nov 11 2019 1:31AM

नगर : बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात कांद्याचे दर पडल्याने, संतप्त शेतकर्‍यांनी लिलाव बंद पाडले. तसेच बाह्यवळण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. (छाया : समीर मननगर : तालुका प्रतिनिधी 
तालुका बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत गुरुवारी (दि.7) कांद्याचे दर थेट 100 रुपये क्विंटलवर आल्याने संतप्त शेतकर्‍यांनी लिलाव बंद पाडले. समाज माध्यमांमध्ये 100 रुपये किलो कांद्याचे दर झाल्याची ओरड होत असताना, प्रत्यक्षात मात्र शेतकर्‍यांकडून कवडीमोल दराने कांदा खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांचा निषेध करीत शेतकर्‍यांनी  पुन्हा लिलाव करण्यास भाग पाडले.

तालुका बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत काल कांद्याचे लिलाव थेट 100 रुपयांपासून सुरू झाले. चांगला कांदा तीन हजार साडेतीन हजार रुपये क्विंटल दराने विकला गेला. मात्र, या दराने विकल्या गेलेल्या कांद्याचे प्रमाण कमी होते. खराब कांद्यासाठी कमी दर मिळणे शेतकर्‍यांनाही अपेक्षित होते. मात्र, ओल्या कांद्याच्या दरात चांगला कांदाही विकला जात असल्याने शेतकर्‍यांमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या. त्याचा उद्रेक होऊन शेतकर्‍यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले.

यावेळी व्यापार्‍यांवर काद्यांची फेकाफेकही करण्यात आली. बाह्यवळण रस्त्यावर रास्तारोका आंदोलन करण्यात आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर व्यापार्‍यांना पुन्हा लिलाव घेण्यास भाग पाडण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाजार समितीचे सभापती विलासराव शिंदे, संचालक दिलीप भालसिंग उपस्थित होते. त्यांनी शेतकरी व व्यापारी यांच्यामध्ये चर्चा घडवून आणून लिलाव पुन्हा सुरू केले. त्यानंतर सुमारे चार हजार रूपये क्विंटल दरांपर्यंत काही कांद्याची विक्री झाली.

आडते व्यापार्‍यांची मनमानी
तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत आडते व्यापार्‍यांकडून अनेकदा मनमानी केली जात असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून होत आहे. अडीचशे व्यापारी असल्याने बाहेरील व्यापार्‍यांनाही बाजार समितीत येण्यास अटकाव होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बाजार समितीत ‘आम्ही म्हणू ती पूर्व’ असे धोरण आडत व्यापार्‍यांकडून घेतले जात असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. संचालक मंडळाने यात लक्ष न घातल्यास,  उपबाजारात कांद्याची आवक घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.