Wed, Jun 03, 2020 08:55होमपेज › Ahamadnagar › कर्डिले यांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीची धडक

कर्डिले यांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीची धडक

Published On: Jan 26 2019 1:10AM | Last Updated: Jan 26 2019 12:13AM
पांढरीपूल : शैलेश डमाळे

राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचा मानला जाणारा जेऊर गट हा आ.शिवाजीराव कर्डिले यांचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याने वेळोवेळी आ. कर्डिले यांना साथ दिली असून, मताधिक्य दिले आहे. या जेऊर गटात राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा 31 जानेवारीला येणार असून, यावेळी सायंकाळी होणार्‍या जाहीर सभेत दिग्गज नेत्यांचा तोफा धडाडणार आहेत.

सन 2009 व 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आ. शिवाजी कर्डिले यांना तनपुरे दाम्पत्याने लढत दिली. 2009 च्या निवडणुकीत प्रसाद तनपुरे यांचा आठ हजार मतांनी पराभव झाला होता. तर 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने तनपुरे यांना उमेदवारी नाकारून शिवाजी गाडे यांना उमेदवारी दिली. यावेळी उषाताई तनपुरे शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यांना 25 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. आ. कर्डिले यांना घाटावरील गावातून मोठे मताधिक्य मिळाले होते.  दोन्ही निवडणुकीत पराभव स्वीकारून तनपुरे कुटुंब न खचता आजही राजकारणात सक्रिय आहे. त्यातच आता नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांचे मामा जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. जयंत पाटलांमुळे तनपुरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे.  भाचे प्राजक्त तनपुरे यांच्या विजयासाठी जयंत पाटील पूर्ण ताकद लावणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आ. कर्डिले यांचा बालेकिल्ला असणार्‍या जेऊर (ता.नगर) गटात मत परिवर्तनासाठी राष्ट्रवादीचा फौजफाटा दाखल होत आहे. दि. 31 जानेवारी रोजी निर्धार परिवर्तन यात्रा जेऊरमध्ये येत आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. छगन भुजबळ व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे असे राज्यातील तगडे नेते सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.  आमदार कर्डिले यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे नेते काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. चिचोंडी शिराळ येथेही धनंजय मुंडे यांची सभा झाली होती.  विविध सामाजिक उपक्रम सध्या प्राजक्त तनपुरे या परिसरात राबवत आहेत.  येणारी निवडणूक लक्षात घेऊन या भागात चांगला जनसंपर्क वाढवला आहे. येणार्‍या काळात आ. कर्डिले विरुद्ध तनपुरे ही लढत अटीतटीची होणार आहे.