होमपेज › Ahamadnagar › नऊ वनपरिक्षेत्रात बिबट्यांचे वाढते हल्ले; सरकारकडून  58 लाखांची नुकसान भरपाई

६२८ जनावरांचा फडशा..१ व्यक्तीचाही बळी!

Published On: Nov 19 2018 12:59AM | Last Updated: Nov 18 2018 10:49PMनगर : कैलास ढोले

नगर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून बिबटयांची संख्या वाढत असल्याचे लक्षात येते. पूर्वी उत्तर जिल्ह्यातील काही तालुके वगळता बिबटयांचा वावर कमी असायचा परंतु त्याने आता दक्षिणेकडेही आपला मोर्चा वळविल्याचे दिसते.वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारीपासून बिबटयांनी नऊ वनपरिक्षेत्रातील हद्दीत 628 पाळीव जनावरांचा फडशा पाडला असून त्याच्या या  सपाटयात एका  माणसाचाही बळी गेला आहे. त्याच्या या भुकेपायी सरकारला सुमारे 58 लाखांची नुकसान भरपाई द्यावी लागली आहे. मात्र तरीही त्याची भूक वाढतेच  आहे. 

कधी काळी बिबटया हा वनामध्ये, जंगलात सुखनैव फिरायचा, त्यातून वन्य प्राण्यांच्या शिकारी करायचा,त्यामुळे निसर्गाचा एक प्रकारे समतोल साधण्याचे काम व्हायचे. परंतु बिबटया गावकुसाला  आला आणि सारेच चित्र बदलले.बिबटया माणसावर हल्ले करू लागला.  पाळीव प्राण्याची शिकार करू लागला. काही नसलेच तर उसातील उंदीर, घुसी , वस्तीवरील कोंबडयावरही तो भागवून घेऊ लागला. खरे तर बिबटयांचा गावकुसात प्रवेश हा माणसांनी ओढवून घेतलेले संकट आहे. वनाचे क्षेत्रात लोकांचा प्रचंड वावर वाढला. वृक्षतोड वाढली. नदी नाले कमी होऊ लागले.पाणवटे गेले. पूर्वीच्या पडिक जमिनी कसल्या जाऊ लागल्या. वनात लोकांचे  अतिक्रमण झाले आणि त्यामुळे बिबटयांचे फिरण्याचे क्षेत्र कमी झाले. परिणामी तो गावाच्या उंबरटयावर येऊन पोहचला. त्यातून माणूस व बिबटया हा संघर्ष सुरू झाला.

या संघर्षाची परिणिती म्हणजे बिबटयांचे माणूस व पाळीव प्राण्यावर वाढते हल्ले सुरू झाले. त्यात कधी माणूस बळी जाऊ लागला तर सर्रास तर पाळीव जनावरांचे मोठे नुकसान होऊ लागले. नगर वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार  जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्याच्या कालावधीत श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी, तिसगांव, टाकळी ढोकेश्‍वर, पारनेर, अ.नगर, राहुरी, कोपरगाव या 9 वनपरिक्षेत्रामध्ये बिबटयाने 628 पाळीव जनावरांवर हल्ले चढविले. त्यातील बहुतेक जनावरे हे मृत्युमुखी पडले. त्याच प्रमाणे तीन माणसांवर बिबटयाने हल्ले केले. त्यातील 1मयत तर 2 जखमी झाले. या शिवाय वन्य पशू नागरी भागात आल्याने शेतीपिकांचेही मोठे नुकसान झाल्याचे आकडेवारी स्पष्ट करते. एकूण 280 प्रकरणे शेतीचे नुकसानीचे आहेत.

कोपरगाव, राहुरी व नगर तालुक्यात पशुधनांचे मोठे नुकसान झाले आहे. कोपरगाव तालुक्यात 154, राहुरी तालुक्यात 161 तर नगर तालुक्यात 174 प्रकरणे पाळीव जनावरांवर हल्ले झाल्याचे दिसते.
अकोले तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगा आल्या आहेत. तसेच वनसंपदा विपूल  असल्याने साहजिकच वन्य प्राण्यांचा तेथे जास्त वावर  आहे. तेथे बिबटयांचाही वावर मोठा आहे. परंतु कालांतराने हा बिबटया अकोल्यातून उत्तरेतील राहुरी, संगमनेर, राहता या तालुक्यात येऊ लागला. त्यानंतर तो दक्षिणेकडील पारनेर, श्रीगोंदा,नगर तालुका, पाथर्डी तालुक्याचा काही भागात तो आला. त्यातून माणसांवरील हल्ले वाढत गेले. जनावारेही मारली जाऊ लागली. दक्षिणेप्रमाणेच उत्तर जिल्ह्यातही विशेषत ः अकोल,े संगमनेर तालुक्यात यापेक्षाही मोठा धुमाकूळ बिबटयाने घातलेला आहे. वनविभागाला बिबटयाचा वाढता वावर डोकेदुखी बनू लागली आहे. बिबटया माणसाच्या हद्दीत आल्याने माणूस व बिबटया संघर्ष सुरू झाला आहे. आत हा संघर्ष थांबायचा कधी असा प्रश्‍न पुढे आला आहे. 

बिबटयाला सरकारचे संरक्षण आहे, मात्र माणसावरील वाढत्या हल्ल्याबद्दल काय ? हा प्रश्‍न अनुत्तीरत आहे. अर्थात बिबटयाचे स्थलांतर होण्याला माणूसच  कारणीभूत  आहे. बिबटयाचे अधिवास बदलला. त्याचे खाणेपाणही बदलले. कधई काळी रूबाबशीर पणे फिरणारा  आणि शिकार करणारा हा बिबटया आता चोरून लपून एका कोंबडीवर आपली  भूक भागवतो. एकूणच त्याचा शिकारी बाणा हरपत चालला आहे. आगामी काळात माणूस विरूद्ध बिबटया हा संघर्ष वाढत जाणार  आहे,त्यातून बिबटया आणि माणूस दोन्हीही जगले पाहिजेत हे सूत्र स्वीकारावे लागणार आहे.

वनपरिक्षेत्रनिहाय प्रकरणे व नुकसान भरपाई याप्रमाणेः

कोपरगाव - शेतपीक नुकसान-40 प्रकरणे-2 लाख 72 हजार रुपये भरपाई, पशुधन नुकसान-154 प्रकरणे-11 लाख 88 हजार रुपये भरपाई, राहुरी- पशुधन नुकसान-161 प्रकरणे-7 लाख 55 हजार 789 रुपये भरपाई, नगर- शेतपीक नुकसान- 106 प्रकरणे-4 लाख 61हजार 250 रुपये भरपाई, पशुधन नुकसान- 174 प्रकरणे-8 लाख 40 हजार रुपये भरपाई, पारनेर- शेतपीक नुकसान-15 प्रकरणे-1 लाख 97हजार रुपये भरपाई, पशुधन नुकसान- 65 प्रकरणे- 5 लाख 93 हजार 300 रुपये भरपाई, मनुष्य मृत -1 प्रकरण- 3 लाख रुपये भरपाई, जखमी मनुष्य - 1 प्रकरण- 35 हजार रुपये भरपाई, टाकळी ढोकेश्‍वर -शेतपीक  नुकसान-3 प्रकरणे-20 हजार 500 रुपये भरपाई, पशुधन नुकसान- 7 प्रकरणे-55 हजार रुपये  भरपाई, तिसगाव- शेतपीक नुकसान-14 प्रकरणे- 62 हजार 500 रुपये भरपाई, पशुधन नुकसान- 4 प्रकरणे-37 हजार 500 रुपये भरपाई, पाथर्डी-शेतीपीक नुकसान-11 प्रकरणे- 87 हजार 500 रुपये भरपाई, पशुधन नुकसान-9 प्रकरणे- 45 हजार रुपये भरपाई,मनुष्य जखमी- 1 प्रकरण- 1 लाख रुपये भरपाई, श्रीगोंदा- शेतीपीक नुकसान- 1 लाख 48 हजार 500 रुपये  भरपाई, पशुधन नुकसान- 18 प्रकरणे- 1 लाख 53 हजार 500 रुपये भरपाई, कर्जत- शेतीपीक नुकसान- 64 प्रकरणे- 1 लाख 91 हजार 500रुपये भरपाई, पशुधन नुकसान- 36 प्रकरणे- 2 लाख 8 हजार 600 रुपये भरपाई