Sun, Feb 24, 2019 02:08होमपेज › Ahamadnagar › अकोलेत किसान सभेचा जेलभरो सत्याग्रह

अकोलेत किसान सभेचा जेलभरो सत्याग्रह

Published On: Aug 11 2018 1:18AM | Last Updated: Aug 11 2018 1:18AMअकोले : प्रतिनिधी

शेतकर्‍यांंच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अकोलेत किसान सभेच्या वतीने काल हजारो आंदोलकांनी रस्त्यावर उतरून जेलभरो सत्याग्रह करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय स्तरावर किसान सभेच्या वतीने दहा कोटी सह्या संकलित करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. देशभर जेलभरो करून या सह्या तहसीलदारांमार्फत प्रधानमंत्र्यांना सादर करण्याची हाक देण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रात 20 लाख सह्या संकलित करून राज्यभरातील तहसील कार्यालयांमार्फत प्रधानमंत्र्यांना पाठविण्यात येत आहेत. अकोलेत संपन्न झालेल्या जेलभरो सत्याग्रहात अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने 25 हजार 400 सह्या यावेळी अकोले तहसीलदारांना सादर करण्यात आल्या.

सर्व शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ करा, शेतीमालाला स्वामिनाथन समितीच्या शिफारशी प्रमाणे उत्पादक खर्चाच्या दीडपट हमी भाव द्या, वन जमिनींचे नवे दावे स्वीकारा, वन जमीन कसणार्‍यांचे नावे करा, पिक पाहणीचे अर्ज स्वीकारून त्याची पोहोच द्या, तालुक्यात अनेक गरीब निराधार योजनेच्या लाभापासून वंचित आहेत, अशा लाभार्थी नोंदणीची मोहीम हाती घेऊन सर्व पात्र लाभार्थींना मानधन सुरु करा, अन्न सुरक्षेच्या यादीत नवीन लाभार्थ्यांचा समावेश करा, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. 

शेतकर्‍यांच्या प्रलंबित प्रश्‍नांसाठी किसान सभेच्या वतीने नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला होता. लाँगमार्चमध्ये शेतक-यांच्या सन 2017 पर्यंतच्या कर्जाचा कर्जमाफीत समावेश करण्याबाबत सकारात्मक आश्वासन देण्यात आले होते. लाँग मार्चला  सहा महिने उलटून जाऊनही कर्जमाफीत अद्याप 2017 च्या शेतकर्‍यांचा समावेश करण्यात आला नाही. वन जमिनी नावे करण्यातही अक्षम्य दिरंगाई केली जात आहे. जेल भरोमध्ये या बाबत शेतकर्‍यांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

यावेळी कॉ. अजित नवले, कॉ. यादवराव नवले, कॉ. सदाशिव साबळे, कॉ नामदेव भांगरे, कॉ. साहेबराव घोडे, कॉ. सुरेश भोर, कॉ. खंडू वाकचौरे, कॉ. सारंगधर तनपुरे, कॉ. लक्ष्मन पथवे, कॉ. गणपत मधे, कॉ. ज्ञानेश्वर काकड, कॉ. मथुराबाई बर्डे, कॉ. शांताराम बर्डे, कॉ. दामू भांगरे आदी सहभागी झाले होते.