Sun, Aug 18, 2019 06:49होमपेज › Ahamadnagar › जगतापांच्या आदेशानेच एकवेळ सफाई!

जगतापांच्या आदेशानेच एकवेळ सफाई!

Published On: Feb 12 2019 1:04AM | Last Updated: Feb 12 2019 12:32AM
नगर : प्रतिनिधी

महापालिका कर्मचारी युनियनला विचारात न घेता, लाड समितीच्या शिफारसींचा भंग करुन शहरात दोन वेळा साफसफाई करण्याचा घेतलेला निर्णय बेकायदेशीर आहे. तत्कालीन महापौर संग्राम जगताप यांच्या आदेशानुसारच दोन वेळा साफसफाई बंद होऊन एक वेळा साफसफाईचा निर्णय झालेला होता. हा आदेश प्रशासनाने धुडकावल्याचा दावा युनियनने केला असून, यामुळे मनपा प्रशासनासह आ.जगताप यांचीही गोची झाली आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात 20 फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिला आहे.

आ. संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व महापालिका अधिकार्‍यांची संयुक्‍त बैठक 9 फेब्रुवारीला पार पडली. यात कचर्‍याच्या समस्येवर उपाययोजनांवर चर्चा होऊन शहरात पुन्हा दोन वेळा साफसफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारपासून (दि.11) शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुपारी साफसफाईही सुरु करण्यात आली आहे. मनपा कर्मचारी युनियनने या निर्णयाला जोरदार आक्षेप घेत आयुक्‍तांना निवेदन देऊन 20 फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

निवेदनात म्हटले की, शहरातील कचरा उचलण्याच्या मागणीबाबत आमचे दुमत नाही. मात्र, झाडलोट करणार्‍या कर्मचार्‍यांना अनावश्यकरित्या दोन वेळा काम नेमून देण्यास कर्मचारी युनियनचा ठाम विरोध आहे. कामगारांच्या प्रश्‍नांबाबत व कामकाजाबाबत चर्चा करण्यापूर्वी अथवा निर्णय घेण्यापूर्वी कायद्यानुसार मान्यताप्राप्‍त असलेल्या कामगार संघटनेस चर्चेसाठी आमंत्रित करण्याचे कायदेशीर बंधन महापालिकेवर आहे. असे असतांनाही सदरच्या चर्चेत आमच्या संघटनेला सहभागी करुन घेण्यात आले नाही. कोणतीही पूर्वसूचना आम्हाला देण्यात आली नाही. राज्य शासनाने स्वीकारलेल्या लाड समितीच्या शिफारसी महापालिकेवर बंधनकारक आहेत. त्या महापालिकेने स्वीकारलेल्याही आहेत. लाड समितीने सफाई कामगारांना सकाळी सलगपणे एकपारगी म्हणजेच एकवेळ काम नेमून देण्याची महत्वपूर्ण शिफारस केलेली आहे. त्याला अनुसरुन तत्कालीन महापौर संग्राम जगताप यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला होता. तत्कालीन महापौर जगताप, मनपा प्रशासन व युनियनच्या संयुक्‍त बैठकीत सकाळी एकवेळ काम नेमून देण्याची मागणी केलेली होती. त्याला अनुसरून तत्कालीन महापौर जगताप यांनीच सफाई कामगारांना एकवेळ साफसफाईचे काम नेमून देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार आजतागायत सफाई कामगारांना एकवेळ काम नेमून देण्याची प्रथा सुरू आहे. असे असतांना तत्कालीन महापौर जगताप यांचे आदेश एकतर्फी रद्दबातल ठरवून व लाड समितीच्या शिफारसींचा उघडपणे भंग करुन दोन वेळा साफसफाईचे काम नेमून देण्याचा बेकायदेशीर निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या बेकायदेशीर धोरणास युनियनचा विरोध असून लाड समितीच्या शिफारसींनुसार एकवेळ काम नेमून देण्याच्या मागणीसाठी 20 फेब्रुवारीपासून मनपा कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही लोखंडे यांनी दिला आहे.

    *लाड समितीच्या शिफारसींचा झाला भंग
    *बेमुदत धरणे आंदोलनाचा दिला इशारा
    *दुपारच्या सत्रात साफसफाईला सुरुवात

दुपारी सहा प्रमुख रस्त्यांवर झाली साफसफाई

महापालिका प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार सोमवारी () चारही प्रभाग समिती कार्यालयांच्या हद्दीतील सहा प्रमुख रस्त्यांवर साफसफाई करण्यात आली. भिस्तबाग चौक ते श्रीराम चौक, नेप्तीनाका ते आयुर्वेद कॉर्नर, चांदणी चौक ते स्टेट बँक चौक, बालिकाश्रम रोडवर गिते हॉस्पिटल ते महालक्ष्मी उद्यान, कायनेटिक चौक ते सक्कर चौक व केडगाव परिसरातील इंगळे वस्ती ते पंचशील वाडी या प्रमुख रस्त्यांवर मनपा कर्मचार्‍यांकडून स्वच्छता करण्यात आल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.