Mon, Sep 16, 2019 12:23होमपेज › Ahamadnagar › फसवणूक झालेल्यांनाच घेतले ताब्यात

फसवणूक झालेल्यांनाच घेतले ताब्यात

Published On: Nov 15 2018 1:03AM | Last Updated: Nov 14 2018 11:37PMनेवासा : प्रतिनिधी 

फायनान्स कंपनीचे कर्ज देण्याच्या अमिषाने अनेकांना गंडा घालणार्‍या तरुणाच्या पत्नीनेच नेवाशातील चौघांनी आपला पती गायब केल्याची तक्रार केली. तक्रारीची  दखल घेत पुण्याच्या पोलिसांनी शहरातील तिघांना ताब्यात घेतले.  दरम्यान, कर्जाच्या पैशाच्या मोहापायी शहरातील सुमारे 27 जणांना या तरुणाने चुना लावल्याची चर्चा होत आहे. फसवणूक झालेल्यांवरच पोलिस कारवाई होत असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील एका तरुणाने नेवासा शहरातील लोखंडे गल्लीमधील एकाच्या ओळखीच्या आधारे जानेवारी 2018 मध्ये एमएएफसी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने फायनान्स कंपनीचे कार्यालय मळगंगा शॉपिंग सेंटरमध्ये थाटले. गावातील दोघांना  या कार्यालयात नोकरीही दिली. त्यामुळे अनेकांचा या कंपनीवर विश्‍वास बसला.कोणास कर्ज हवे असल्यास अगोदर काही रक्कम गुंतावी लागेल, असे सांगण्यात येत होते. या फायनान्स कंपनीमध्ये शहरातील प्रतिष्ठित व सर्वसामान्य लोकांनी जवळपास 20ते 25 लाख रुपये गुंतविले आहेत. प्रारंभी 27 जणांनी 10, 25. 50 हजार अशा मिळून जवळपास 16 लाख रुपये ठेवले. नंतर  रकमा वाढल्या गेल्या.  काहींना पैसेही दिले गेल्याने विश्‍वास बसत गेला.   तीन महिने हा सिलसिला चालूच होता. एप्रिल 2018 मध्ये हे कार्यालय अचानक गायब झाले. मग कंपनीत  नोकरीला असलेल्या  गावातीलच लोखंडे गल्ली व खळवाडीमधील  कर्मचार्‍यांच्या घरी  लोकांच्या हेलपाटे सुरू झाले. तो धुळ्याचा तरुण कुठे गेला? आमच्या पैशांचे काय झाले? असा तगादा सुरू झाल्याने हे कर्मचारी तसेच फसवणूक झालेल्यांनही धुळ्याच्या तथाकथित नितीन रामचंद्र माळी ऊर्फ निखिल रामचंद्र अहिरराव याचा व त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला. मात्र तो सापडत नव्हता. फोन केला, तर मी नाशिकला आहे, तर कधी मी पुण्याला असल्याचा तो सांगत होता. काही दिवसांनी पैसे देतो, असेही तो सांगत असल्याने फसवणुकीची तक्रार पोलिसांकडे करण्यास कोणीही पुढे येत नव्हते. 

गंडा घालणारा तरुण व साथीदाराचा शोध घेण्यासाठी पदरमोड करून अनेकांना दूरवरचा प्रवास करावा लागला. अखेर हा माळी शनिवारी (दि.10) पुण्याच्या तळेगाव दाभाडे याठिकाणी भेटला. नेवासा फाट्यावर फसवणूक धारकांबरोबर चर्चा झाली. दोन- तीन दिवसांत निम्मे पैसे देण्याचे या तरुणाने आश्‍वासन देऊन  पोलिसात तक्रार देऊ नका, अशी विनवणी त्याने केली.

असे असतानाच नितीन माळीच्या पत्नीनेच पुणे पोलिसांकडे माझा पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. त्यात  नेवाशातील सचिन विलास कडू, अंबादास पोपट लोखंडे, दादासाहेब मैराळ व नंदू शिंदे यांच्यावर संशय व्यक्त केला. त्यामुळे बुधवारी पहाटेच पुण्याच्या पोलिसांनी नंदू शिंदे वगळता इतर तिघांना चौकशीसाठी  ताब्यात घेतल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उलटसुलट चर्चा होत आहे. 

पहाटे पुणे पोलिसांनी तिघांना उचलल्यानंतर फसवणूक झालेल्यांनी नेवासा पोलिस ठाण्यात धाव घेतली. या तरुणाविरुद्ध े केवळ तक्रार अर्ज देण्यात आला होता.त्यावेळी पुण्याचे पोलिस झाल्यानंतर नेवाशाचे बघू, असे नेवासा पोलिस निरीक्षक रणजित ढेरे यांनी सांगितल्याचे एका फसवणूकगस्ताने सांगितले.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार !

या फायनान्स कंपनीमध्ये शहरासह तालुक्यातील तामसवाडी, निंभारी, पुनतगाव, पाचेगाव, रामडोह, बेलपिंपळगाव, इमामपूर, गोणेगाव, दिघी, सौंदाळा आदी ठिकाणचे व्यावसायिक, कामगार, शेतकरी, प्रतिष्ठितांचा सहभाग असल्याने फसवणूक झाल्याचे सांगता येत नसल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.