Sat, Jul 04, 2020 20:08होमपेज › Ahamadnagar › नैसर्गिक आपत्तीत अहमदनगर जिल्ह्यातील पाच व्यक्‍तींचा मृत्यू

नैसर्गिक आपत्तीत अहमदनगर जिल्ह्यातील पाच व्यक्‍तींचा मृत्यू

Last Updated: Nov 14 2019 1:39AM
नगर : प्रतिनिधी
ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने जिल्हाभरात थैमान घातले. या नैसर्गिक आपत्तीत जीवित हानी आणि घरांची पडझड झाली आहे.  अंगावर वीज पडून, नदीपात्रात वाहून व इतर घटनेमुळे नेवासा तालुक्यात पाच व्यक्‍तींचा मृत्यू झाला आहे. पावसाच्या दणक्याने एकूण 36 लहान -मोठी जनावरे दगावली आहेत. या पावसाच्या फटक्यात  391 घरांची पडझड झाली आहे. नैसर्गिक आपत्तीत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्‍तींच्या वारसांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. घरांची पडझड झालेल्या काही  घरमालकांना अनुदान दिले आहे.  

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र तिसर्‍या आणि चौथ्या आठवड्यात परतीच्या पावसाने जिल्हााभरात अक्षरश: थैमान घातले. मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे नेवासा तालुक्यातील पाच जण मरण पावले. दुधाळ जनावरांबरोबरच ओढकाम करणार्‍या जनावरांना या पावसाचा फटका बसला. एकूण 36 जनावरे मरण पावली. यामध्ये मोठी दुधाळ 12 व लहान 21 जनावरांचा समावेश आहे. अकोले तालुक्यात सर्वाधिक सात जनावरे मरण पावली. पाथर्डीत 2, नगर तालुक्यात एक, श्रीरामपूर तालुक्यातील एका मोठ्या जनावराचा समावेश आहे. 

 या आपत्तीत एकूण 21 लहान जनावरे दगावली. यामध्ये नगर तालुक्यातील 4, पाथर्डीतील 3, पारनेर मधील 2, व संगमनेर तालुक्यातील 10 जनावरांचा समावेश आहे. ओढ काम करणारी तीन जनावरे देखील या आपत्तीत दगावली आहेत. एकूण 36 जनावरांपैकी 16 जनावरांच्या मालकांना नुकसानभरपाई अदा केली आहे. आता पर्यंत जनावरांच्या मालकांना  एकूण 1 लाख 21 हजार रुपयांचे अनुदान वाटप केले आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील एक व राहुरी तालुक्यातील चार पक्क्या घरांची पूर्णत: पडझड झाली आहे. त्यापैकी अनुदानासाठी एक घर पात्र ठरले आहे. शेवगाव तालुक्यातील एका पक्क्या घराची अंशत: पडझड झाली. याशिवाय 386 कच्च्या घरांची मात्र अंशत: पडझड झाली आहे. यामध्ये राहुरी तालुक्यातील 145 घरांचा समावेश आहे. त्याखालोखाल 75 घरे संगमनेर तालुक्यातील आहेत. नगर तालुक्यातील 17, नेवासा तालुक्यातील 23, पाथर्डीतील 24, पारनेर तालुक्यातील 13, राहातामधील 23, श्रीरामपूर तालुक्यातील 28, अकोले तालुक्यातील 25 व कर्जत तालुक्यातील 13 घरांचा समावेश आहे.

एकूण पडझड झालेल्या कच्च्या घरांपैकी 175 घरे अनुदानासााठी पात्र ठरली आहेत. त्यानुसार नगर तालुक्यातील चार घरांच्या मालकांना एकूण 26  हजार तर पारनेर तालुक्यातील 13 घरमालकांना एकूण 78 हजार रुपये नुकसानभरपाई अदा केली आहे.अदा केली आहे.

या नैसर्गिक आपत्तीत नगर तालुक्यातील दोन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. जिल्हाभरातील श्रीगोंदा, कोपरगाव व जामखेड हे तीन तालुके वगळता जिल्हाभरातील 398 खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. यामध्ये राहुरी तालुक्यातील 149, संगमनेर तालुक्यातील 76, श्रीरामपूर तालुक्यातील 29, नगर तालुक्यातील 18, मालमत्तेचा समावेश आहे. यापैकी काही मालमत्तेच्या नुकसानभरपाईपोटी 2 लाख 21 हजार रुपयांचे अनुदान संबंधित बाधित व्यक्‍तींना अदा केले आहे.