Sat, Jul 11, 2020 12:39होमपेज › Ahamadnagar › भंडारदर्‍याचे आवर्तन बंद केल्याने संताप

भंडारदर्‍याचे आवर्तन बंद केल्याने संताप

Published On: Apr 05 2019 1:46AM | Last Updated: Apr 06 2019 1:52AM
श्रीरामपूर : प्रतिनिधी

भंडारदरा धरणाचे सुरू असलेले आवर्तन काल अचानकपणे बंद करण्यात आल्याने श्रीरामपूर, देवळाली प्रवरासह लाभक्षेत्रातून शेतकर्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. काल दिवसभर अनेक ठिकाणी आंदोलने, ठिय्या देऊन प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आल्याने   हा प्रश्‍न चिघळणार आहे. त्यामुळे गोदावरीच्या आवर्तनाप्रमाणे भंडारदर्‍याचे आवर्तन पुन्हा सुरू करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवण्याची शक्यता आहे. 

भंडारदरा धरणातून 15 तारखेला आवर्तन सुरू झाले होते. 8 एप्रिलपर्यंत ते सुरू राहणार होते. त्या धर्तीवर शेतकर्‍यांनी नियोजन केले होते. मात्र, काल अचानकपणे हे आवर्तन बंद झाल्याने याचे तीव्र पडसाद लाभक्षेत्रात उमटल्याचे पाहायला मिळाले. याबाबत कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांचे लक्ष वेधले असता, या आवर्तनासाठी जिल्हाधिकार्‍यांनी 2400 दलघफू पाण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी 1700 क्यूसेकने कालवा सुरू करून तो कमी-कमी करण्यात आला होता. त्यातून या आवर्तनातून 2400 पेक्षा जास्त म्हणजे 2712  दलघफू पाणी वापरण्यात आल्याने हे आवर्तन बंद करण्यात आले आहे. वास्तविक धरणात या आवर्तनानंतर आता 2757 दलघफू पाणी शिल्लक आहे. यातील 2100 दलघफू पाणी हे 31 जुलैपर्यंत पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. उर्वरित 700 ते 750 दलघफू पाण्याचे पिण्यासाठी तीन आवर्तने करणार आहोत. उर्वरित 650 दलघफू पाण्यापैकी 450 मृतसाठा आहे, तर उर्वरित 150 ते 200 दलघफू पाणी हे ई ऑपरेशन म्हणून वापरले जाणार आहे. अशाप्रकारे पाण्याचे नियोजन झालेले असल्याने हे आवर्तन बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय महाराष्ट्रात उन्हाळ्यात पिण्यासाठी आवर्तने कुठेही होत नाही. मात्र, भंडारदर्‍यातून यावर्षी तसे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना पाणी मिळालेले नसले तरी पिण्याच्या पाण्याची समस्या मात्र जाणवणार नाही, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली.तसेच या आवर्तनातून गावतळी भरण्याबाबत विचारले असता, नगरपालिका, पाचेगाव अशा मंजुरी असलेल्या गावतळ्यात पाणी भरण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. याव्यतिरिक्त अन्य मंजुरी नसलेल्या तळे भरण्यासाठी मंजुरी दिलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, जलसंपदा विभागाकडून अशाप्रकारे नियोजन असले, तरी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना कालच्या 2700 दलघफू आवर्तनाचा लाभ झालेला नाही. हे पाणी खालच्या भागातील शेतकर्‍यांपर्यंत पोहचलले नाही. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांच्या भावना तीव्र आहेत. यातून मोठे जनआंदोलन भडकण्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रशासनाने शेतकर्‍यांची भावना लक्षात घेऊन गोदावरीचे बंद केेलेले आवर्तन ज्या प्रमाणे पुन्हा सुरू केले, तसेच भंडारदर्‍याचे आवर्तन सुरू करावे, अशीही मागणी केली जात आहे.