Sat, Aug 24, 2019 10:01होमपेज › Ahamadnagar › मतदानाचा कालावधी दोन तासांनी वाढविला  

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 

Published On: Jun 16 2018 1:28AM | Last Updated: Jun 16 2018 12:06AMनगर ः प्रतिनिधी

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या 25 जून रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदानाचा कालावधी दोन तासांनी वाढविण्यात आला आहे. दरम्यान, या निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. विभागाीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम माने हे 20 जून रोजी निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत.

नगरसह नाशिक, जळगाव, धुळे व नंदूरबार या पाच जिल्ह्यासाठी हा मतदारसंघ असून, नगर जिल्ह्यात मतदानासाठी वीस मतदान केंद्र निश्‍चित केले आहेत. या मतदान केंद्रांवर सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत म्हणजे आठ तास मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार होती. भारत निवडणूक आयोगाने यामध्ये आता बदल केला आहे. मतदान करण्याचा कालावधी आणखी दोन तासांनी वाढविला आहे. त्यामुळे आता सकाळी 7 वाजल्यापासून मतदानास प्रारंभ होणार आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे. 

निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम माने हे 20 जून रोजी जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत. यावेळी ते मतदान केंद्राध्यक्षांची बैठक घेवून त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत. 

कोरडा दिवस 

या निवडणुकीच्या अनुषंगाने 24 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपासून ते 25 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी (दि.28) सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरडा दिवस पाळण्यात येणार आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांना निर्देश देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.  मतदानाबाबत मतदारांत जनजागृती व्हावी, यासाठी तालुकास्तरावर विविध उपक्रम हाती घेतले गेले आहेत. पसंतीक्रम पध्दतीच्या मतदानाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या मार्गदर्शनाचा लाभ मतदारांनी मोठया संख्येने घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.