Sat, Aug 24, 2019 10:18होमपेज › Ahamadnagar › दुष्काळी अनुदान जमा,सन्मान निधीकडे नजरा

दुष्काळी अनुदान जमा,सन्मान निधीकडे नजरा

Published On: Mar 11 2019 1:26AM | Last Updated: Mar 11 2019 1:26AM
शेवगाव : प्रतिनिधी

शासनाचे  33 कोटी दुष्काळी अनुदान शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा झाले असून, पंतप्रधान सन्मान योजना निधीचा अद्याप थांगपत्ता नाही.

गतवर्षी निसर्गाच्या अवकृपेने खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील पिक वाया गेले. हे वर्ष उत्पन्नाच्या दृष्टीने शेतकर्‍यांना हानीकारक ठरले. परिणामी शासनाला दुष्काळ जाहीर करावा लागला. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हतबल होऊन येणारे तप्त उन्हाचे चार महिने ही त्यांची अग्निपरीक्षा आहे. यात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा हा सर्वात मोठा गंभीर प्रश्‍न सतावत आहे. आर्थिक टंचाईने तो जर्जर झाला आहे. शासन देत असलेले अनुदान हे शेतकर्‍यांना काडीचा आधार होणार असले तरी आवश्यक गरजा पूर्ण करताना त्यास उन्हाची झळ सोसावी लागणार आहे.

सन 2018 मध्ये पिकाचे नुकसान झाल्याने शासनाने बाधित शेतकर्‍यांसाठी दुष्काळी मदतीची तरतूद केली. त्यानुसार शेवगाव तालुक्यासाठी 52 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. प्रथम शासनाने 30 कोटी 86 लाख 64 हजार रुपये एवढा निधी मंजूर केला होता. यात पहिल्या टप्प्यात 15 कोटी 19 लाख 88 हजार रुपये दिले. बाधित शेतकर्‍यांना हेक्टरी 6 हजार 800 रुपये प्रमाणे दोन हेक्टरपर्यंत तर बहुपिकास हेक्टरी 18 हजार रुपये असणारी ही मदत दोन टप्प्यात विभागून देण्याचे निर्देश होते, मात्र आठ दिवसांत दुसर्‍या टप्प्यातील 15 कोटी 66 लाख 76 हजार निधी प्राप्त होऊन सर्व अनुदान एकरकमी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित केले. 30 कोटी 86 लाख 64 हजार रुपये प्राप्त होताच शासनाने या तालुक्यास आणखी 21 कोटी रुपये आकस्मिक निधी दिल्याने एकूण 52 कोटी निधी प्राप्त झाला.

तालुक्यात 113 गावांतील 67 हजार 462 शेतकर्‍यांना 33 कोटी 14 लाख रुपयाचे अनुदान वितरीत करण्यात आले. सर्व बँकांना ही रक्कम मिळण्यासाठी सुलभ पद्धत वापरली गेल्याने काही गावांतील शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यात आले आहे. तर इतरही गावात ही प्रक्रिया चालू असल्याने दोन दिवसांत सर्वच शेतकर्‍यांना अनुदान मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पंतप्रधान सन्मान योजनेतील अनुदानासाठी दोन हेक्टरच्या आत क्षेत्र असणारे 37 हजार शेतकरी आहेत. यापैकी 32 हजार 500 शेतकरी ऑनलाईन झाले आहेत. काही शेतकरी रोजंदारी निमित्त बाहेरगावी असल्याने त्यांची माहिती संकलित केली जात आहे तर ऑनलाईन झालेल्या अनेक शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांक अधुरे व चुकीचे आहेत. तेही घेण्यात येत असले तरी अचूक माहिती दिलेल्या अनेक शेतकर्‍यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळाला नाही.

बँक अधिकार्‍यांची आज बैठक

शासनाचे दुष्काळी अनुदान लवकरात लवकर शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग व्हावे, यासाठी आज सोमवारी बँक अधिकार्‍यांची बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीत या सूचना देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार विनोद भामरे यांनी दिली आहे.