होमपेज › Ahamadnagar › अण्णांना पाठिंब्यासाठी पारनेरमध्ये बंद 

अण्णांना पाठिंब्यासाठी पारनेरमध्ये बंद 

Published On: Feb 03 2019 1:13AM | Last Updated: Feb 03 2019 12:34AM
पारनेर : प्रतिनिधी   

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात  आलेल्या बंदला पारनेर शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळी विविध सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी शहरातून पोलिस ठाण्यावर मोर्चा नेत जेलभरो आंदोलन केले. त्यात 125 आंदालकांना अटक करण्यात आली. हजारे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असल्याने आंदोलकांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. त्यामुळे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे, पत्रकार संजय वाघमारे, शाहीर गायकवाड, पं.स.सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, राहुल शिंदे, प्राचार्य डॉ.रंगनाथ आहेर, शिवाजी व्यवहारे, डॉ. राजेश भनगडे, संजय मते, नंदकुमार देशमुख, डॉ. मुदस्सिर सय्यद, विजय डोळ, संदीप मोढवे, नामदेव ठाणगे, धीरज महांडूळे, डॉ. सादीक राजे, डॉ. नरेंद्र मुळे, सलीम राजे, सुरेश शिंदे, युवराज पठारे, सचिन नगरे यांच्यासह पारनेर महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी यांनी मोर्चात सहभागी होउन शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. पारनेर महाविद्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. लालचौक मार्गे मुख्य बाजारपेठेतून मोर्चा पोलिस ठाण्यात धडकल्यानंतर मोर्चाचे निषेध सभेत रुपांतर झाले. 

सभापती राहुल झावरे म्हणाले, अण्णा हे केवळ पारनेरचे भुमिपूत्र नसून ती देशाची संपत्ती आहे. लोकपाल, लोकायुक्त तसेच स्वामीनाथन आयोगाच्या मागणीमागे समाजाचे हित जपलेले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी चार दिवस उपोषण केल्याने अण्णांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या जिवितास धोका निर्माण झाल्यास त्यास हे सरकार जबाबदार असेल असा इशारा दिला. सामाजिक कार्यकर्ते सुरेश पठारे यांनी राजकीय स्वार्थासाठी अण्णांचा वापर होत असल्याबद्दल खेद व्यक्त केला. स्वतःच्या स्वार्थासाठी व लालसेपोटी अनेक राजकीय पुढार्‍यांनी अण्णांचे उंबरठे झिजवले. सध्या अण्णांचे आंदोलन सुरू असताना या पुढार्‍यांनी मात्र त्याकडे पाठ फिरविली आहे. अण्णांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने न पाहून आंदोलन मागे घेण्याच्या हालचाली न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. 

सोशल मीडियाच्या वापराचे आवाहन

चार दिवस हाऊनही सरकारने हे आंदोलन गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोप सुरेश पठारे व संजय वाघमारे यांनी केला. या आंदोलनाची जनजागृती करून सरकारवर दबाव आणण्यासाठी तरुणांनी व्हॉटस् अ‍ॅप,  फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडियाचा वापर करून जनजागृती करण्याचे आवाहन पठारे व वाघमारे यांनी केले. 

125 आंदोलकांना अटक 

मोर्चा पोलिस ठाण्यात पोहचून निषेध सभा झाल्यानंतर आंदोलकांनी त्यांना अटक करण्याची मागणी केली. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी 125 आंदोलकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

बंदमुळे प्रवाशांचे हाल

बंद पुकारण्यात आल्याने बाहेरगावावरून आलेल्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. सरपंच परिषदेसाठी आलेल्या तालुक्यातील विविध गावांच्या सरपंचांनाही चहाशिवाय परतावे लागले.

भीक मांगो आंदोलन करणार

हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी तसेच आंदोलनास मदत करण्यासाठी शहरात भीक माँगो आंदालन करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. गणेश कावरे यांनी सांगितले. हजारे यांचे आंदोलन कोणा उद्योगपतींच्या देणग्यांवर उभे नाही तर सर्वसामान्यांनी दिलेल्या योगदानातून सुरू आहे. त्यामुळे आम्ही भीक माँगो आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे ते म्हणाले.